सोशल मीडियावर चुकीची माहिती पसरवणाऱ्यांविरोधात ‘क्राईम मास्टर गोगो’ आक्रमक
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते आणि श्रद्धा कपूरचे वडील शक्ती कपूर यांच्या निधनाचे वृत्त सोशल मीडियावर वाऱ्यासारखे पसरले आणि चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये एकच खळबळ उडाली. ७३ वर्षीय शक्ती कपूर यांचे निधन झाल्याच्या खोट्या पोस्ट काही समाजकंटकांनी व्हायरल केल्या होत्या. या बातमीमुळे अनेक चाहत्यांनी सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहण्यासही सुरुवात केली होती. मात्र, या अफवेचा फटका बसलेले खुद्द शक्ती कपूर यांनीच आता समोर येत या सर्व बातम्यांचा कडाडून निषेध केला आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर करत आपण पूर्णपणे ठणठणीत आणि सुरक्षित असल्याची माहिती दिली आहे.
स्वतःच्या मृत्यूच्या खोट्या वृत्तामुळे शक्ती कपूर कमालीचे संतापले आहेत. त्यांनी आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून एक व्हिडिओ प्रसिद्ध केला असून, त्यात ते म्हणतात, “नमस्कार, माझ्या निधनाबद्दल पसरवली जाणारी बातमी पूर्णपणे निराधार आणि खोटी आहे. मी अतिशय आनंदी आणि निरोगी आहे. अशा संवेदनशील विषयात खोटी माहिती पसरवणे हा मानसिक त्रास देण्याचा प्रकार आहे.” शक्ती कपूर यांनी केवळ स्पष्टीकरणच दिले नाही, तर अशा अफवा पसरवणाऱ्यांविरोधात कायदेशीर पावले उचलण्याचा आणि पोलिसांत तक्रार करण्याचा इशाराही दिला आहे.
व्हिडिओमध्ये शक्ती कपूर यांचा चेहरा काहीसा नाराज दिसत होता. एखाद्या व्यक्तीच्या आयुष्याबद्दल अशा प्रकारे चुकीच्या बातम्या पसरवणे हे त्यांच्या कुटुंबासाठी आणि जवळच्या व्यक्तींसाठी किती वेदनादायक असू शकते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. “सोशल मीडियाचा वापर चांगल्या गोष्टींसाठी करा, कोणाला तरी मारण्यासाठी नाही,” अशा कडक शब्दांत त्यांनी अफवा पसरवणाऱ्यांना सुनावले आहे. या व्हिडिओनंतर त्यांच्या चाहत्यांनी सुटकेचा निश्वास सोडला असून, अशा समाजकंटकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.




