‘पूजा-पाठ आणि मद्यपान’ यावरून विचारलेल्या प्रश्नावर गोविंदाची पत्नी भडकली; रोखठोक उत्तराने सोशल मीडियावर खळबळ
बॉलिवूडचा ‘नंबर वन’ अभिनेता गोविंदा याची पत्नी सुनीता आहुजा सध्या त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध असलेल्या सुनीता यांनी एका पॉडकास्टमध्ये ट्रोल्सचा असा काही समाचार घेतला की, त्याची चर्चा आता सर्वत्र रंगली आहे. एका जुन्या मुलाखतीत त्यांनी घरातील आवडती जागा ‘दारू पिण्याची’ असल्याचं म्हटलं होतं, ज्यावरून सोशल मीडियावर त्यांना ‘पूजा-पाठ करता आणि मद्यपानही?’ असा प्रश्न विचारून डिवचण्याचा प्रयत्न झाला. यावर संताप व्यक्त न करता सुनीता यांनी आपल्या खास ‘बिंदास’ शैलीत उत्तर देत विरोधकांची बोलती बंद केली.
सुनीता आहुजा म्हणाल्या की, “मी कोणाच्या बापाच्या पैशाने दारू पित नाही. आयुष्य जगताना संतुलन राखणं महत्त्वाचं असतं. मी पूजा-पाठ करते याचा अर्थ असा नाही की मी साध्वी झाले आहे किंवा हातात कमंडलू घेऊन बसले आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, त्या एक सामान्य स्त्री आहेत, त्यांना कुटुंब आहे आणि त्यांना जसं आवडतं तसं जगण्याचा त्यांना पूर्ण अधिकार आहे. मद्यपान आणि अध्यात्म या दोन्ही गोष्टींकडे त्या अत्यंत व्यावहारिक दृष्टिकोनातून पाहतात. “डॉक्टरही सांगतात की दोन पेग हृदयासाठी चांगले असतात,” असं मिश्किल विधान करत त्यांनी आपण स्वतःच्या अटींवर जगणाऱ्या महिला असल्याचं सिद्ध केलं.
ट्रोलिंगवर भाष्य करताना त्यांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की, लोक काय म्हणतात त्याने त्यांना काडीचाही फरक पडत नाही. “मला कोणी जेवायला घालत नाही किंवा माझ्या ड्रिंक्सचे पैसे भरत नाही, मग मी इतरांचा विचार का करू?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. ‘लाफ्टर शेफ्स ३’ मधील त्यांच्या सहभागामुळे आधीच त्या चर्चेत होत्या, पण आता या ‘बॅलन्स्ड लाईफस्टाईल’च्या विधानामुळे त्यांनी पुन्हा एकदा इंटरनेटवर धुमाकूळ घातला आहे. सुनिता यांच्या या रोखठोक अंदाजामुळे काहीजण त्यांच्यावर टीका करत असले, तरी अनेकांनी त्यांच्या या प्रामाणिकपणाचे कौतुकही केले आहे.




