राज्यात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः महिला आणि लहान मुलींवरील अत्याचारांच्या वाढत्या घटनांनी समाज अस्वस्थ झाला आहे. अशातच पुण्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे.
चार वर्षांच्या निरागस मुलीवर एका विकृत व्यक्तीने अत्याचार करून तिची निर्दयी हत्या केल्याचे उघड झाले आहे. एवढेच नव्हे, तर आपल्या गुन्ह्याचे पुरावे लपवण्यासाठी आरोपीने त्या चिमुरडीचा मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली दडवून ठेवला.
या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. अनेक सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांनी रस्त्यावर उतरून निषेध नोंदवला आहे. आरोपीला त्वरित आणि कठोर शिक्षा देण्याची मागणी होत असून, काही नागरिकांनी तर आरोपीला आमच्या ताब्यात द्या, असा आक्रमक पवित्राही घेतला आहे.
पोलीस प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे आणि नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन केले आहे. मात्र, या घटनेने संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळली असून, आरोपीविरुद्ध कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे.




