Sunil Gavaskar : आयपीएल सामने की ‘वेळकाढूपणा’? सुनील गावस्कर बीसीसीआयवर संतापले

spot_img

” ४ तास चालणाऱ्या सामन्यांमुळे प्रेक्षकांचा संयम सुटला; गावस्करांनी सांगितली खेळाची ‘पवित्रता’

इंडियन प्रीमियर लीगचा १८ वा हंगाम सध्या कमालीच्या चुरशीचा ठरत असला, तरी सामन्यांच्या अवाढव्य वाढलेल्या वेळेमुळे क्रिकेटप्रेमींमध्ये नाराजीचा सूर उमटत आहे. मूळ नियमानुसार तीन तासांत संपणारा टी-२० सामना आता चक्क चार तासांच्याही पुढे जात आहे, ज्यामुळे खेळाचा थरार ओसरताना दिसत आहे. याच मुद्द्यावरून भारताचे महान फलंदाज आणि माजी कर्णधार सुनील गावस्कर यांनी बीसीसीआयला घरचा आहेर दिला आहे. “खेळाच्या मैदानात खेळाडू आणि पंचांशिवाय इतर कोणालाही येण्याची परवानगी देऊ नका, तरच खेळाची पवित्रता टिकेल,” अशा शब्दांत गावस्करांनी आपला संताप व्यक्त केला आहे.

यंदाच्या मोसमात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील सामना तब्बल ४ तास २२ मिनिटे चालला, जो आयपीएल इतिहासातील सर्वाधिक वेळ चालणाऱ्या सामन्यांपैकी एक ठरला. या ‘स्लो ओव्हर रेट’वर नियंत्रण मिळवण्यासाठी बीसीसीआयने कर्णधारांना दंड आणि बंदीसारख्या कारवाया केल्या, पण तरीही वेळेचा प्रश्न सुटलेला नाही. गावस्कर यांच्या मते, मैदानात वारंवार पाणी घेऊन येणारे राखीव खेळाडू आणि सपोर्ट स्टाफची फौज हेच या वेळकाढूपणाचे मुख्य कारण आहे. “राखीव खेळाडू उगाचच सीमारेषेवरील क्षेत्ररक्षकाला पाणी देण्यासाठी मैदानात धावत येतात, ही सवलतीचा गैरफायदा घेणारी बाब आहे,” असे त्यांनी आपल्या स्तंभात लिहिले आहे.

गावस्करांनी यावेळी दिग्गज क्रिकेटपटू रिची बेनो यांचा संदर्भ देत मैदानाची तुलना ‘पवित्र जागे’शी केली आहे. “मैदान ही अशी जागा आहे जिथे अनावश्यक लोकांचा वावर नसावा. स्ट्रॅटजिक टाइम-आऊटमध्येही लोकांची जत्रा भरलेली असते, त्यावर बंदी हवी. केवळ दोन ड्रिंक्स बॉय आणि दोन कोचिंग स्टाफ सदस्यांव्यतिरिक्त कोणालाही आत सोडले जाऊ नये,” अशी मागणी त्यांनी केली आहे. ऑल-एक्सेस कार्ड असलेले कमिटी मेंबरही बाउंड्रीच्या आत जाणार नाहीत, याची खबरदारी बीसीसीआयने घ्यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली आहे. आता गावस्करांच्या या सल्ल्यानंतर बीसीसीआय सामन्यांचा वेळ कमी करण्यासाठी कोणते कडक पाऊल उचलते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ