Virar Crime : विरारमध्ये मध्यरात्री किरकोळ वादातून दगड-रॉडने हाणामारी, कारची तोडफोड

spot_img

विरार पूर्वेकडील चंदनसार रोड परिसरात मध्यरात्रीच्या सुमारास धक्कादायक घटना घडली. एर्टीगा कार आणि ॲक्टिवा चालक यांच्यात सुरुवातीला किरकोळ वाटणारा वाद काही क्षणांतच हिंसक स्वरूपात बदलला. यूटर्न घेताना इंडिकेटर न दिल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या या वादाने पुढे तुफान हाणामारीचे रूप घेतले.

प्रत्यक्षदर्शींनुसार, वाद वाढत गेल्यानंतर दोन्ही बाजूंतील लोकांनी एकमेकांवर दगड आणि लोखंडी रॉडने हल्ला केला. या गोंधळात एर्टीगा कारमधील एका तरुणाने संतापाच्या भरात स्वतःच्या वाहनाच्या काचा फोडल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकारात काही जण जखमी झाल्याचेही सांगितले जात आहे. लोखंडी रॉडने डोक्यावर वार केल्यामुळे परिस्थिती अधिकच गंभीर बनली होती.

या घटनेमुळे परिसरात काही काळ भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले. संपूर्ण प्रकार एका नागरिकाने मोबाईलमध्ये चित्रित केला असून, हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. व्हिडिओतील हिंसक दृश्यांमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरोधात तक्रारी दाखल केल्या आहेत. त्यानुसार विरार पोलिस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला असून, व्हिडिओच्या आधारे संबंधितांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा वाढत्या रोड रेजच्या प्रवृत्तीवर आणि सार्वजनिक ठिकाणी वाढत्या हिंसाचारावर गंभीर प्रश्न उपस्थित करते.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ