माढा तालुक्यातील उपळाई खुर्द येथे एका विवाहित महिलेचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची घटना समोर आली असली, तरी या प्रकरणाने संशयाचे गडद सावट निर्माण केले आहे. मृत महिलेचे नाव भाग्यश्री रविंद्र क्षिरसागर असे असून, तिच्या मृत्यूमागे अपघात नसून घातपाताचा डाव असल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे.
या प्रकरणी महिलेच्या भावाने माढा पोलिस स्टेशन येथे तक्रार दाखल केली असून, तिच्या पतीविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पती रविंद्र क्षिरसागर हे व्यवसायाने शिक्षक असून, त्यांच्या विरोधात गंभीर आरोप करण्यात आले आहेत. तक्रारीनुसार, 2011 साली झालेल्या विवाहानंतर भाग्यश्री यांना सातत्याने मानसिक आणि शारीरिक छळ सहन करावा लागत होता. पती दारूच्या नशेत मारहाण करत, शिवीगाळ करत तसेच माहेरहून दोन लाख रुपये आणण्याची मागणी करत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. याशिवाय, त्यांच्या चारित्र्यावर संशय घेत वारंवार त्रास दिला जात असल्याचाही आरोप कुटुंबीयांनी केला आहे.
दरम्यान, विजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असली, तरी कुटुंबीयांनी व्यक्त केलेल्या संशयामुळे प्रकरण अधिक गंभीर झाले आहे. पोलिसांनी या घटनेची दखल घेत सखोल तपास सुरू केला असून, सर्व बाजूंनी पुरावे गोळा करण्याचे काम सुरू आहे. ही घटना पुन्हा एकदा कौटुंबिक छळ, हुंडा प्रथा आणि महिलांच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित करत आहे.




