Paytm Payments Bank : सामान्य जनतेच्या हितासाठी रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय

spot_img

हायकोर्टात धाव घेत बँक पूर्णपणे गुंडाळण्याची प्रक्रिया सुरू

भारतीय फिनटेक क्षेत्रातील एकेकाळचा दिग्गज खेळाडू असलेल्या ‘पेटीएम पेमेंट्स बँक’ला (PPBL) आता सर्वात मोठा कायदेशीर दणका बसला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून रिझर्व्ह बँकेच्या रडारवर असलेल्या या बँकेचा बँकिंग परवाना (License) RBI ने कायमचा रद्द केला आहे. २४ एप्रिल २०२६ रोजी कामकाजाची वेळ संपताच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली. याचाच अर्थ असा की, बँकिंग रेग्युलेशन कायद्यांतर्गत ही बँक आता कोणत्याही प्रकारचे व्यवहार, ठेवी किंवा नवीन ग्राहक जोडणे यांसारख्या सेवा देऊ शकणार नाही. व्यवस्थापनातील त्रुटी आणि ग्राहकांच्या हिताकडे केलेले दुर्लक्ष यामुळे हा कठोर निर्णय घेतल्याचे RBI ने स्पष्ट केले आहे.

रिझर्व्ह बँकेने आपल्या अधिकृत निवेदनात म्हटले आहे की, पेटीएम पेमेंट्स बँकेचे कामकाज हे सामान्य जनतेच्या आणि ठेवीदारांच्या हिताला बाधा आणणारे होते. परवान्यातील अनेक अटींचे वारंवार उल्लंघन केल्यामुळे आणि व्यवस्थापनातील गंभीर त्रुटींमुळे बँकेला अस्तित्वात राहण्याचा कोणताही अधिकार उरलेला नाही. केवळ परवाना रद्द करून RBI थांबलेली नाही, तर आता ही बँक कायमची बंद करण्यासाठी (Winding Up) रिझर्व्ह बँक उच्च न्यायालयात अर्ज दाखल करणार आहे. या प्रक्रियेमुळे आगामी काळात पेटीएम पेमेंट्स बँकेचे नाव बँकिंग विश्वातून पूर्णपणे पुसले जाण्याची शक्यता आहे.

या निर्णयाचा थेट परिणाम पेटीएमच्या (One 97 Communications) शेअर्सवरही पाहायला मिळाला. शेअर बाजारात अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाल्याने गुंतवणूकदारांमध्ये चिंतेचे सावट आहे. मात्र, सामान्य ग्राहकांसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे, रिझर्व्ह बँकेने स्पष्ट केले आहे की बँकेकडे आपल्या सर्व ग्राहकांच्या ठेवी परत करण्यासाठी पुरेसा निधी (Liquidity) उपलब्ध आहे. त्यामुळे बँक बंद होण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी ग्राहकांचे पैसे सुरक्षित राहतील याची खबरदारी प्रशासन घेणार आहे. जर तुमचे पैसे या बँकेत असतील, तर घाबरून न जाता अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ