“शिवराय थकले होते…” बागेश्वर बाबांच्या वक्तव्याने नवा वाद; भोंदूगिरी खपवून घेणार नाही, विरोधक आक्रमक
नागपूर येथे आयोजित ‘भारदुर्गा शक्तिस्थळ शिलान्यास’ सोहळ्यात बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या एका विधानामुळे महाराष्ट्रात मोठे राजकीय आणि सामाजिक वादळ उठले आहे. या कार्यक्रमाला सरसंघचालक मोहन भागवत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी यांसारखे दिग्गज नेते उपस्थित असताना, बागेश्वर बाबांनी शिवरायांच्या संघर्षाबद्दल मांडलेला किस्सा अत्यंत संतापजनक असल्याचा आरोप केला जात आहे. “शिवाजी महाराज युद्ध करताना थकले होते आणि त्यांनी आपला राजपाट समर्थ रामदास स्वामींच्या चरणी अर्पण करून विश्रांतीची इच्छा व्यक्त केली होती,” असे विधान शास्त्री यांनी केले, ज्यावर आता कडाडून टीका होत आहे.
बागेश्वर बाबांनी आपल्या भाषणात दावा केला की, शिवराय एकदा थकल्यामुळे रामदास स्वामींकडे गेले आणि त्यांनी आपला मुकुट खाली ठेवून युद्ध न लढण्याची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर समर्थांनी त्यांना कर्तव्याची जाणीव करून दिली आणि पुन्हा मुकुट परिधान करण्यास सांगितले. इतिहासाची मोडतोड करणाऱ्या या वक्तव्यामुळे शिवप्रेमींमध्ये प्रचंड संताप निर्माण झाला आहे. यापूर्वीही तुकोबाराय आणि ज्ञानेश्वर माऊलींबद्दल वादग्रस्त विधाने करणाऱ्या बागेश्वर बाबांनी आता थेट शिवछत्रपतींचा अवमान केल्याची भावना व्यक्त होत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) आमदार रोहित पवार यांनी या प्रकरणावर अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे. “शिवराय थकले आणि राजपाट समर्थांकडे दिला, हे या भोंदूचे वक्तव्य महाराष्ट्राचा अपमान करणारे आहे,” अशा शब्दांत त्यांनी आपला संताप व्यक्त केला. विशेष म्हणजे, अशा विधानावेळी राज्याचे प्रमुख नेते मंचावर उपस्थित होते, याचे जास्त दुःख वाटते, असेही पवार म्हणाले. “या भोंदूवर महाराष्ट्रात तात्काळ बंदी घालावी, अन्यथा सरकारला याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील,” असा इशाराही त्यांनी दिला आहे. या प्रकरणामुळे राज्यातील राजकीय वातावरण पुन्हा एकदा तापले असून बागेश्वर बाबांच्या अटकेची किंवा बंदीची मागणी जोर धरू लागली आहे.




