“तुळशीची माळ घातली म्हणजे काम सोडलं असं नाही”; अफवा पसरवणाऱ्यांना सुनावत मांडली स्पष्ट भूमिका
प्रसिद्ध टीव्ही अभिनेता करण वाही सध्या त्याच्या अभिनयक्षेत्रातील निवृत्तीच्या चर्चेमुळे सोशल मीडियावर केंद्रस्थानी आला आहे. एका मुलाखतीत करणने आपल्या बदललेल्या जीवनशैलीबद्दल आणि अध्यात्मिक ओढीबद्दल भाष्य केले होते. गेल्या काही महिन्यांपासून तो नामजप करत असून त्याने पूर्णपणे मांसाहार सोडला आहे. वृंदावनची तुळशीची माळ आणि नीम करोली बाबांच्या शिकवणीमुळे आयुष्यात शांतता आल्याचे त्याने सांगितले. मात्र, या सात्विक बदलाचा चुकीचा अर्थ लावून काही सोशल मीडिया पेजेसनी ‘करणने अभिनय सोडला’ अशा अफवा पसरवण्यास सुरुवात केली, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते.
या अफवांवर संताप व्यक्त करत करण वाहीने इन्स्टाग्रामच्या माध्यमातून सडेतोड स्पष्टीकरण दिले आहे. “अध्यात्मिक होण्याचा अर्थ काम सोडणे असा होत नाही,” असे म्हणत त्याने व्हायरल पोस्ट करणाऱ्यांना ही खोटी बातमी काढून टाकण्याची विनंती केली आहे. यासोबतच, अभिनेत्री जेनिफर विंगेटसोबतच्या लग्नाच्या रंगणाऱ्या चर्चांवरही त्याने पडदा टाकला असून, ती केवळ आपली चांगली मैत्रीण असल्याचे स्पष्ट केले आहे. ‘रिमिक्स’ आणि ‘दिल मिल गए’ पासून प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा करण यापुढेही मनोरंजन सृष्टीत सक्रिय राहणार असून, त्याच्या या खंबीर भूमिकेमुळे अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे.




