सत्या आणि कंपनी चित्रपटांच्या यशाचं गुपित दाऊद इब्राहिम? खळबळजनक खुलाशामुळे बॉलिवूड हादरलं
९० च्या दशकात बॉलिवूड आणि अंडरवर्ल्ड यांच्यातील साटलोटं नेहमीच चर्चेचा विषय राहिलं आहे, पण आता प्रसिद्ध दिग्दर्शक राम गोपाल वर्मा यांनी यावर केलेल्या विधानाने सिनेसृष्टीत मोठी खळबळ उडाली आहे. एका ताज्या मुलाखतीत बोलताना वर्मा यांनी थेट कबुली दिली की, जर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम नसता, तर त्यांचे ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ सारखे गाजलेले सिनेमे कधीच बनले नसते. धक्कादायक बाब म्हणजे, त्यांच्या ‘गन्स अँड थाईज’ या आत्मचरित्राचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, त्यांना हे पुस्तक दाऊदलाच समर्पित करायचे होते, मात्र प्रकाशकांनी ऐनवेळी दाऊदचे नाव काढून टाकले. “माझं घर त्यांच्यामुळेच चालतं,” असे विधान करून त्यांनी सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
ज्या काळात बॉलिवूडमधील बड्या कलाकारांना आणि निर्मात्यांना अंडरवर्ल्डकडून धमकीचे फोन यायचे, त्या काळात राम गोपाल वर्मा मात्र यातून वाचले होते. त्याचं कारण सांगताना वर्मा म्हणाले की, “मला कधीच धमकीचा फोन आला नाही, कारण गुन्हेगारी विश्वातील लोकांना माझे सिनेमे खूप आवडायचे. उलट मी त्यांचा एक प्रकारे जवळचा मित्रच बनलो होतो.” ‘सत्या’ आणि ‘कंपनी’ या चित्रपटांनी अंडरवर्ल्डचे वास्तव अत्यंत जवळून मांडल्याने या गुन्हेगारांना आपली प्रतिमा लोकांपर्यंत पोहोचवण्यात रस होता, असेही त्यांनी सूचित केले.
या प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले ते मुंबईचे माजी पोलीस अधिकारी डी. शिवानंदन यांच्या दाव्यामुळे. शिवानंदन यांनी स्पष्टपणे आरोप केला आहे की, सत्या, कंपनी आणि शूटआउट ॲट लोखंडवाला यांसारख्या चित्रपटांना केवळ तांत्रिक माहितीच नाही, तर आर्थिक रसदही अंडरवर्ल्डकडून पुरवली जात होती. आपली गुन्हेगारी प्रतिमा ‘सौम्य’ करण्यासाठी किंवा लोकांमध्ये आपली दहशत व वलय टिकवण्यासाठी गुंड या चित्रपटांना पाठिंबा देत असत. इतकेच नव्हे तर ‘दीवार’ आणि ‘मुकद्दर का सिकंदर’ सारख्या जुन्या क्लासिक चित्रपटांमागेही अशाच प्रकारची शक्ती होती, असा गंभीर दावा त्यांनी केला आहे. राम गोपाल वर्मा यांच्या या खुलाशानंतर आता सिनेसृष्टी आणि गुन्हेगारी जगतातील या जुन्या आणि गडद नात्यावर पुन्हा एकदा नवी चर्चा सुरू झाली आहे.




