घरातील प्रत्येक सदस्याची काळजी घेणारी गृहिणी अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करते. सकाळपासून रात्रीपर्यंत सततची धावपळ, स्वयंपाक, मुलांची जबाबदारी, ताणतणाव आणि वेळेअभावी तिच्या आरोग्यावर नकळत परिणाम होत असतो. त्यामुळे स्वतःची काळजी घेणे तितकेच गरजेचे आहे.
अनेकदा कामाच्या गडबडीत गृहिणी स्वतः नाश्ता टाळतात, पण ही सवय टाळायला हवी. आहारात कडधान्ये, फळे किंवा किमान दूध तरी समाविष्ट करणे आवश्यक आहे.
तसेच दिवसभर पुरेसे पाणी पिणे शरीरासाठी अत्यंत गरजेचे आहे. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि थकवा कमी होतो.
दुपारी जेवल्यानंतर लगेच झोप घेण्याची सवय टाळावी. यामुळे कफ-पित्तासारख्या समस्या वाढू शकतात. विश्रांती हवी असल्यास हलकेच रिलॅक्स होणे योग्य ठरेल.
व्यायामासाठी वेळ मिळत नसल्यास घरातच १५-२० मिनिटे चालणे किंवा सोपे व्यायाम करणे फायदेशीर ठरते. यामुळे शरीर सक्रिय राहते.
अनेक गृहिणी जेवणानंतर लगेच घरकामाला लागतात, परंतु ही सवय आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जेवणानंतर थोडा वेळ विश्रांती घेणे आवश्यक आहे.
तसेच वारंवार उपवास करणे, शिळे अन्न खाणे आणि सतत चहा पिणे या सवयी टाळायला हव्यात, कारण यामुळे पचनाशी संबंधित त्रास उद्भवू शकतो.
एकंदरीत, कुटुंबाची जबाबदारी पार पाडताना गृहिणींनी स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करू नये. कोणतीही त्रासाची लक्षणे जाणवल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.




