मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात ‘ऑरेंज अलर्ट’; रब्बी पिकांसह फळबागांचे अतोनात नुकसान
एप्रिल महिना सुरू होऊनही राज्यावर घोंघावणारे पावसाचे सावट कमी होताना दिसत नाहीये. भारतीय हवामान विभागाने आजही राज्याला मोठा इशारा दिला असून, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट होण्याची शक्यता वर्तवली आहे. विशेषतः अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, धुळे, नंदूरबार, नाशिक आणि जळगाव या जिल्ह्यांमध्ये पावसाचा ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला असून, उर्वरित महाराष्ट्रातही पावसाचा पिवळा इशारा देण्यात आला आहे.
धाराशिव जिल्ह्यात आज पहाटे पुन्हा निसर्गाचा प्रकोप पाहायला मिळाला. कळंब, वाशी आणि तुळजापूर परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे द्राक्ष, आंबा आणि केळी यांसारख्या फळबागांना मोठा फटका बसला आहे. काढणीला आलेला गहू आणि ज्वारीची पिके पावसाने भिजल्यामुळे शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट मातीमोल झाले आहेत. गेल्या १५-२० दिवसांपासून धाराशिवमध्ये सुरू असलेल्या या सातत्यपूर्ण अवकाळीने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला असून, आता भरपाईसाठी मदतीची हाक दिली जात आहे.
वाशिम जिल्ह्यातही परिस्थिती चिंताजनक आहे. मंगरुळपीर, कारंजा आणि रिसोड तालुक्यात रात्री झालेल्या वादळी पावसामुळे काढणीला आलेला बिजवाई कांदा आणि इतर पिके आडवी झाली आहेत. वाऱ्याचा वेग इतका प्रचंड होता की पिके भुईसपाट झाल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती आहे. एकीकडे वाढत्या उष्णतेचा पारा आणि दुसरीकडे सतत बदलणारे हे लहरी हवामान यामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडला असून, पुढील काही दिवस पावसाचा जोर असाच कायम राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.




