तोंडात किंवा घशात होणाऱ्या छोट्या जखमा, गाठी किंवा आवाजातील बदल अनेकदा दुर्लक्षित केले जातात. मात्र, हेच संकेत डोके आणि मानेचा कर्करोग किंवा तोंडाचा कर्करोगाचे सुरुवातीचे लक्षण असू शकतात, असा इशारा तज्ज्ञांनी दिला आहे.
भारतातील एकूण कर्करोग रुग्णांपैकी सुमारे 26 ते 30 टक्के रुग्ण हे हेड-नेक कॅन्सरचे असल्याचे आढळते. तंबाखू, गुटखा, बीडी, सिगारेट आणि मद्यपान या सवयींमुळे या कॅन्सरचा धोका लक्षणीय वाढतो. जागतिक आरोग्य संघटना अंतर्गत अहवालानुसार जगभरात दरवर्षी लाखो नवीन रुग्णांची नोंद होते.
तज्ज्ञांच्या मते, तोंडातील तीन आठवड्यांपेक्षा जास्त काळ न भरणारी जखम, गालाच्या आतील भागावर पांढरे किंवा लाल डाग, गिळताना त्रास, सतत घसा दुखणे, मानेला गाठ किंवा आवाजात बदल ही लक्षणे गंभीर असू शकतात. अशा वेळी विलंब न करता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
तज्ज्ञांच्या मते, या कॅन्सरपासून बचाव करण्यासाठी तंबाखूजन्य पदार्थ पूर्णपणे टाळणे, मद्यपान बंद करणे, नियमित आरोग्य तपासणी करणे आणि संतुलित आहार घेणे आवश्यक आहे. तोंडाची स्वच्छता राखणे आणि नियमित दंत तपासणीही महत्त्वाची ठरते.
जागतिक कर्करोग दिनानिमित्त नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, भीती न बाळगता जागरूक राहावे, वेळेवर तपासणी करून घ्यावी आणि निरोगी जीवनशैली स्वीकारावी. लवकर निदान केल्यास उपचार सोपे होतात आणि जीवनमान सुधारते.




