नाशिक शहरातील सातपुर परिसरातील शिवाजीनगर भागात एका बिबट्याने रहिवासी वस्तीत प्रवेश केल्याने मोठी खळबळ उडाली. नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्यानंतर वनविभागाने तातडीने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले.
सुरुवातीला बिबट्या झाडाझुडपांमध्ये लपून बसला होता. त्याला बाहेर काढण्यासाठी जेसीबीच्या मदतीने झुडपे हटवण्यात आली. मात्र, नंतर हा बिबट्या एका गेस्टहाऊसच्या मागील बाजूच्या खिडकीजवळ अत्यंत अवघड जागेत जाऊन बसला, ज्यामुळे त्याला पकडणे अधिकच कठीण झाले.
वनविभागाच्या पथकाने संयमाने कारवाई करत बिबट्याला गुंगीचे इंजेक्शन दिले. काही वेळातच तो बेशुद्ध झाल्यानंतर त्याला सुरक्षितपणे ताब्यात घेण्यात आले. अनेक तास चाललेल्या या रेस्क्यू ऑपरेशनला अखेर यश मिळाले. बिबट्याला पकडण्यात आल्यामुळे परिसरातील नागरिकांनी मोठा दिलासा घेतला असून भीतीचे वातावरण निवळले आहे.




