7 जणांना अटक तरीही मृत्यूचं कारण अस्पष्टच
19 सप्टेंबर रोजी सिंगापूरमध्ये स्कूबा डाइव्हिंगदरम्यान पाण्यात बुडून गायक झुबीन गर्गचा मृत्यू झाला. झुबीन गर्गच्या मृत्यूनंतर अनेक मोठे खुलासे होत आहेत. कारण हे प्रकरण दिसतंय तेवढं सरळ नाहीये. गायक, दिग्दर्शक झुबीन गर्ग (Zubeen Garg) यांच्या मृत्यूबाबत आसाम पोलिसांना अद्यापही सिंगापूरकडून कोणतीही माहिती मिळालेली नाही. सीआयडीचे विशेष डीजीपी मुन्ना प्रसाद गुप्ता यांनी शनिवारी सांगितले की, भारत सरकारने सिंगापूरकडून सीसीटीव्ही फुटेज आणि इतर संबंधित माहिती मागितली आहे. सीआयडीने सिंगापूरमधील 11 जणांना समन्स बजावले आहे जे घटनेच्या वेळी नौकेवर उपस्थित होते. फक्त एकाचा जबाब नोंदवण्यात आला आहे. झुबीन यांची पत्नी गरिमा यांनी सोशल मीडियावर लोकांना न्यायाची मागणी करत राहण्याचे आवाहन केले आहे. गरिमा यांनी लिहिले की, “झुबीन यांच्या मृत्यूला 22 दिवस झाले आहेत, परंतु त्यांचं काय झाले हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.”
राज्य सरकारच्या सूत्रांनुसार, अंतिम शवविच्छेदन आणि व्हिसेरा अहवाल लवकरच जाहीर केला जाईल. यापूर्वी, आसाम सरकारने म्हटले होते की हा अहवाल सार्वजनिक केल्याने तो “कायदेशीररित्या अवैध” ठरेल. पहिल्या पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बुडून मृत्यू झाल्याचे कारण नमूद केले आहे.
गायकाच्या मृत्यूप्रकरणी आतापर्यंत सात जणांना अटक करण्यात आली आहे. यामध्ये झुबीनचा चुलत भाऊ आणि डीएसपी संदीपन गर्ग, व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा, सह-गायक अमृतप्रभा महंत, ईशान्य भारत महोत्सवाचे आयोजक श्यामकानु महंत आणि बँडचे ड्रम मास्टर शेखर ज्योती गोस्वामी यांचा समावेश आहे.




