मध्य-पूर्वेतील तणावपूर्ण परिस्थितीवर संसदेत पंतप्रधान नरेंद्र मोदीयांनी केलेल्या भाषणानंतर देशभरात पुन्हा लॉकडाऊन लागू होणार असल्याच्या अफवा सोशल मीडियावर वेगाने पसरल्या. मात्र, या चर्चांना कोणताही आधार नसून पंतप्रधानांच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला असल्याचे स्पष्ट झाले आहे.
या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री हरदीप सिंग पुरी यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत नागरिकांना अशा अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केले. त्यांनी ठामपणे सांगितले की, देशात लॉकडाऊन लागू करण्याचा कोणताही प्रस्ताव सरकारसमोर नाही.
पुरी यांनी आपल्या पोस्टमध्ये नमूद केले की, जागतिक परिस्थिती काहीशी अनिश्चित असली तरी सरकार ऊर्जा, इंधन आणि जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर बारकाईने लक्ष ठेवून आहे. नागरिकांना कोणतीही अडचण भासू नये यासाठी आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत.
तसेच, भारत कोणत्याही आव्हानाला सामोरे जाण्यास सक्षम असून, सरकार योग्य वेळी समन्वयाने आणि सक्रिय पावले उचलत राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा संवेदनशील काळात अफवा पसरवणे टाळावे आणि जबाबदारीने वागावे, असेही त्यांनी नागरिकांना आवाहन केले.




