पुण्यातील शासकीय कृषी महाविद्यालयात घडलेल्या धक्कादायक घटनेत एका विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून मृत्यू झाला आहे. चैतन्य पुंडलिक चव्हाण (वय 23) असे या विद्यार्थ्याचे नाव असून, तो गेल्या काही दिवसांपासून मृत्यूशी झुंज देत होता. अखेर मंगळवारी उपचारादरम्यान त्याने प्राण सोडले. या घटनेमुळे महाविद्यालयातील सुरक्षेच्या व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.
14 मार्च रोजी रात्री जेवणानंतर चैतन्य मेसमधील वॉटर कुलरजवळ पाणी पिण्यास गेला होता. कुलर व्यवस्थित काम करत नसल्याने त्याने प्लग सॉकेटमध्ये पुन्हा लावण्याचा प्रयत्न केला. त्याच वेळी नळाला हात लावताच त्याला तीव्र विजेचा धक्का बसला आणि तो तिथेच अडकून पडला. वीजपुरवठा बंद केल्यानंतरच त्याला वेगळे करता आले, पण तोपर्यंत तो बेशुद्ध झाला होता.
घटनेनंतर त्याला तातडीने पुण्यातील जहांगीर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, शॉकमुळे मेंदूला गंभीर इजा झाल्याने डॉक्टरांच्या प्रयत्नांनंतरही त्याला वाचवता आले नाही.
विद्यार्थ्यांच्या मते, मेसमध्ये चपला घालण्यास मनाई असल्यामुळे चैतन्य अनवाणी होता, त्यामुळे शॉकचा परिणाम अधिक गंभीर झाला असावा. चैतन्य हा बीड जिल्ह्यातील आष्टी येथील रहिवासी असून कृषी महाविद्यालयात एग्री-बिझनेस मॅनेजमेंटच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या पहिल्या वर्षात शिक्षण घेत होता. त्याचे कुटुंब शेतीवर अवलंबून आहे.
या घटनेनंतर महात्मा फुले कृषी विद्यापीठ प्रशासनाने सर्व महाविद्यालयांचे विद्युत आणि सुरक्षा तपासणीचे आदेश दिले आहेत. दरम्यान, पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू केला आहे.




