रायगड जिल्हा परिषद निवडणुकीनंतर निर्माण झालेल्या राजकीय पेचाला सभापतीपदांच्या निवडीत तात्पुरता तोडगा निघाल्याचे दिसत आहे. सुरुवातीला अध्यक्षपद भाजपकडे आणि उपाध्यक्षपद राष्ट्रवादीकडे गेल्याने शिवसेनेची कोंडी झाली होती. मात्र आज झालेल्या सभापतीपदांच्या निवडीत तिन्ही पक्षांमध्ये समन्वय साधत बिनविरोध निवड करण्यात आली.
या वाटपात शिवसेनेला दोन सभापतीपदे देण्यात आली, तर भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसला प्रत्येकी एक पद मिळाले. त्यामुळे राजकीय समतोल राखण्याचा प्रयत्न झाल्याचे मानले जात आहे. या निवडीदरम्यान मंत्री भरत गोगावले, आमदार महेंद्र दळवी, माजी आमदार अनिकेत तटकरे आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सतीश धारप यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. नव्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या.
रायगड जिल्हा परिषदेसाठी झालेल्या निवडणुकीत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. शिवसेनेला सर्वाधिक २१ जागा मिळाल्या, मात्र भाजप (१५) आणि राष्ट्रवादी (१६) यांनी एकत्र येत सत्ता स्थापन केली. परिणामी सर्वाधिक जागा मिळूनही शिवसेनेला सत्तेबाहेर राहावे लागले होते. सभापतीपदांच्या या नव्या समीकरणामुळे स्थानिक राजकारणात काही प्रमाणात तणाव कमी झाल्याचे चित्र दिसत आहे.




