राज्यात गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसामुळे वातावरण ढगाळ होते, अनेक भागांत गारांसह पावसाने हजेरी लावली. मात्र आता चित्र बदलत असून, उन्हाचा कडाका पुन्हा वाढू लागला आहे. कमाल तापमानाचा पारा ४० अंशांच्या दिशेने झेपावत असल्याने नागरिकांना उष्णतेच्या झळा बसू लागल्या आहेत.
भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार, पुढील पाच दिवस राज्यात प्रामुख्याने उकाडा आणि दमट हवामान राहणार आहे. विशेषतः मुंबई, ठाणे, पालघर, रायगड आणि रत्नागिरी या किनारपट्टी भागांना उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
दुसरीकडे, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशाराही देण्यात आला आहे. सांगली, सातारा, सोलापूर, धाराशिव आणि लातूर या भागांत पावसाची शक्यता आहे, तर काही ठिकाणी हलक्या सरी पडू शकतात.
२५ आणि २६ मार्चदरम्यान विदर्भातील यवतमाळ, चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यांत वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. एकूणच, राज्यात एकीकडे उष्णतेची लाट आणि दुसरीकडे अवकाळी पावसाचे मिश्र चित्र पाहायला मिळणार आहे.




