अशोक खरात प्रकरणात विद्यमान मंत्र्यांच्या चौकशीची मागणी; राऊतांनी उपस्थित केले खळबळजनक सवाल
नाशिकमधील महिला लैंगिक शोषण प्रकरणातील संशयित भोंदूबाबा अशोक खरात याच्या अटकेनंतर आता महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणात उडी घेत राज्य सरकार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोपांच्या फैरी झाडल्या आहेत. खरातला राजाश्रय देणारे त्याचे ‘भक्त’ मंत्री नेमके कोण, असा सवाल करत राऊतांनी खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या दाव्यानुसार, मंत्रिमंडळातील ९ माजी मंत्री आणि काही विद्यमान मंत्री या ढोंगी बाबाचे कट्टर समर्थक असून, त्यांना त्याच्या काळ्या कर्तृत्वाची पूर्ण कल्पना होती.
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत भाजपवर निशाणा साधताना म्हटले की, महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेणे हे केवळ राजकारण असून खऱ्या सूत्रधारांना वाचवण्याचा हा प्रयत्न आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारांना तिलांजली देऊन अशा भोंदू बाबांना राजकारणात आणण्याचे काम सत्ताधारी करत असल्याचा टोलाही त्यांनी लगावला. “मंत्र्यांचे फोटो आणि व्हिडिओ पुराव्यासह समोर येत असताना, त्यांना सहआरोपी का केले जात नाही?” असा सवाल करत त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. या आरोप-प्रत्यारोपामुळे आता हे प्रकरण केवळ गुन्हेगारी स्वरूपाचे न राहता त्याला मोठे राजकीय वळण मिळाले आहे.




