‘जादू-टोणा करणाऱ्यांना महाराष्ट्रात थारा नको’; चाकणकरांच्या राजीनाम्यानंतर ठाकरेंनी मुख्यमंत्र्यांना सुनावले
नाशिकच्या अशोक खरात ऊर्फ भोंदू बाबाच्या काळ्या कारनाम्यांनी राजकारण ढवळून निघाले असतानाच, उद्धव ठाकरे यांनी या प्रकरणावर आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “महाराष्ट्राला आपण आधुनिक म्हणतो, पण काही नेते कर्तृत्वशून्य असल्यामुळेच अशा भोंदू बाबांच्या नादी लागत आहेत,” अशी बोचरी टीका ठाकरेंनी केली. ज्या नेत्यांचे फोटो या भोंदू बाबासोबत व्हायरल होत आहेत, त्यांच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. महाराष्ट्रात अंधश्रद्धा निर्मूलनाचा कायदा असतानाही जबाबदार पदावरील व्यक्ती अशा प्रकारांना खतपाणी घालत असतील, तर ते राज्यासाठी घातक असल्याचे त्यांनी नमूद केले.
उद्धव ठाकरे पुढे म्हणाले की, “काही नेते स्वतःच्या कर्तृत्वावर काही करू शकत नाहीत, म्हणून ते ‘लिंबाच्या’ लागवडीवर आणि ‘ओम फट स्वाहा’वर अवलंबून आहेत.” मुख्यमंत्र्यांनी गृहखात्याचे नाव बदलून ‘पांघरून मंत्रालय’ करावे, कारण सर्व गुन्हेगारांच्या पापावर पांघरून घातले जात आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. गावागावांत असे भोंदू बाबा फोफावत असतील आणि राजकारणी तिथे जात असतील, तर पक्षाचा विचार न करता त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजेत. ‘एपस्टिन फाईल’वरून लक्ष विचलित करण्यासाठी नवीन विषय समोर आणले जात असल्याची शंकाही त्यांनी यावेळी उपस्थित केली.




