इराणविरोधातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेने आखाती देशांसोबत मोठा संरक्षण करार मंजूर केला आहे. या निर्णयानुसार संयुक्त अरब अमिरात, कुवैत आणि जॉर्डन या देशांना एकूण सुमारे 16.46 अब्ज डॉलर किमतीची अत्याधुनिक शस्त्रास्त्रे विकली जाणार आहेत.
या घडामोडींची पार्श्वभूमी अशी आहे की, गेल्या महिन्यात अमेरिका आणि इस्रायलने इराणविरोधात हवाई कारवाया सुरू केल्या. त्याला प्रत्युत्तर म्हणून इराणने मिसाइल आणि ड्रोन हल्ले करत परिस्थिती अधिक चिघळवली. या संघर्षाचा फटका थेट आखाती देशांना बसत असून त्यांना संरक्षणासाठी मोठ्या प्रमाणात सैन्यसामग्रीची गरज भासत आहे. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या नेतृत्वाखाली हा निर्णय घेण्यात आला आहे. अमेरिकेचे परराष्ट्र मंत्रीमार्को रुबिओ यांच्या कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, तातडीच्या सुरक्षेच्या गरजेमुळे या करारासाठी काँग्रेसची मंजुरी आवश्यक नसल्याचे सांगण्यात आले आहे.
या करारात कुवैतला सुमारे 8 अब्ज डॉलर किमतीचे अत्याधुनिक एअर आणि मिसाइल डिफेन्स रडार देण्यात येणार आहेत, जे वेगवान मिसाइल आणि ड्रोन ओळखून त्यांचा मागोवा घेऊ शकतात. संयुक्त अरब अमिरातलाही मोठ्या प्रमाणावर संरक्षण सामग्री मिळणार आहे. यात बॅलेस्टिक मिसाइल शोधणारे रडार, ड्रोन नष्ट करणाऱ्या प्रणाली, एअर-टू-एअर मिसाइल्स तसेच F-16 फायटर जेट्ससाठी लागणारे स्फोटक साहित्य यांचा समावेश आहे. या सर्व करारांची एकूण किंमत अब्जावधी डॉलरमध्ये आहे.
या निर्णयामुळे आखाती देशांची संरक्षण क्षमता वाढणार असली तरी, अमेरिका या परिस्थितीतून आर्थिक फायदा घेत असल्याची टीकाही केली जात आहे.




