भीषण संघर्षात इराणच्या मुख्य रणनीतीकाराचा खात्मा झाल्याने मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता ‘तडजोड न करणाऱ्या’ कट्टर नेत्याच्या हाती कमान सोपवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. यामुळे जागतिक ऊर्जा संकट अधिक गडद होण्याची चिन्हे आहेत.
पश्चिम आशियातील युद्ध आता एका अत्यंत निर्णायक आणि धोकादायक टप्प्यावर पोहोचले आहे. अमेरिका, इस्रायल आणि इराण यांच्यातील या १९ दिवसांच्या संघर्षाचे पडसाद आता थेट भारताच्या सर्वसामान्यांच्या किचनपर्यंत पोहोचले आहेत. इंधन आणि गॅस सिलिंडरच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि तुटवड्यामुळे देशात ऊर्जा संकट ओढवले असतानाच, युद्धाच्या मैदानातून एक मोठी बातमी समोर येत आहे. इस्रायलने केलेल्या अचूक हल्ल्यात इराणचे सर्वात प्रभावशाली रणनीतीकार आणि वरिष्ठ संरक्षण अधिकारी अली लारीजानी यांचा मृत्यू झाला आहे. लारीजानी हे केवळ लष्करी अधिकारी नव्हते, तर इराणची अणू धोरणे आणि संरक्षण नीती ठरवणारे मुख्य सूत्रधार होते. त्यांच्या निधनाने इराणच्या नेतृत्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून, आता हा वारसा कोण चालवणार याकडे जगाचे लक्ष लागले आहे.
लारीजानी यांच्या जागी आता इराणमधील एक अत्यंत ‘कट्टर’ आणि प्रभावी चेहरा म्हणून ओळखले जाणारे सईद जलिली यांचे नाव आघाडीवर आहे. जलिली हे इराणच्या प्रशासनातील अत्यंत अनुभवी नेते असून, २००७ ते २०१३ या काळात त्यांनी पाश्चात्य देशांशी झालेल्या अणू चर्चेत महत्त्वाची भूमिका बजावली होती. विशेष म्हणजे, सईद जलिली हे कोणत्याही परिस्थितीत ‘तडजोड न करणारा’ नेता म्हणून ओळखले जातात. जर इराणने त्यांच्याकडे संरक्षणाची आणि रणनीतीची सर्व सूत्रे सोपवली, तर अमेरिका आणि इस्रायलसाठी ही मोठी डोकेदुखी ठरू शकते.
इराण सध्या मोठ्या संकटात असला तरी त्यांनी माघार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. दुसरीकडे, अमेरिका आणि इस्रायलने इराणला पूर्णपणे नेस्तनाबूत करण्याचा चंग बांधला आहे. अशा परिस्थितीत सईद जलिली यांची संभाव्य नियुक्ती या युद्धाला अधिक आक्रमक वळण देऊ शकते. लारीजानींएवढाच निर्णयक्षम आणि कठोर चेहरा म्हणून जलिली यांच्याकडे पाहिले जात असल्याने, आगामी काळात इराणची रणनीती किती बदलणार आणि त्याचा जागतिक बाजारावर काय परिणाम होणार, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




