इराणवर इस्रायल आणि अमेरिकेकडून करण्यात आलेल्या हल्ल्यानंतर पश्चिम आशियातील तणाव अधिकच वाढला आहे. या संघर्षाचे पडसाद जागतिक राजकारणात उमटताना दिसत आहेत. दरम्यान, या कारवाईमागे सौदी अरेबियाची महत्त्वाची भूमिका असल्याचा दावा समोर आल्याने नव्या चर्चांना सुरुवात झाली आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, सौदी अरेबियाचे क्राउन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान (MBS) यांनी अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी खासगी संवाद साधत इराणविरोधात कठोर लष्करी कारवाईसाठी दबाव टाकला. ट्रम्प सुरुवातीला राजनैतिक मार्गाने प्रश्न सोडवण्याच्या भूमिकेत होते; मात्र MBS यांनी सातत्याने आक्रमक भूमिका मांडली.
अहवालात असेही म्हटले आहे की, सार्वजनिकरित्या संतुलित भूमिका घेणाऱ्या सौदी नेतृत्वाने पडद्यामागे वेगळीच रणनीती अवलंबली. इराणला रोखण्यासाठी लष्करी पर्यायच प्रभावी ठरेल, असा युक्तिवाद करण्यात आल्याचे वृत्त आहे. तसेच, इराणकडून प्रत्युत्तर मिळाल्यास तेलपुरवठा आणि प्रादेशिक सुरक्षेची जबाबदारी सौदी अरेबिया सांभाळेल, असे आश्वासन दिल्याचाही दावा करण्यात आला आहे.
या संदर्भात ट्रम्प यांचे जावई जेरेड कुशनर यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधांचाही उपयोग करण्यात आल्याचे सांगितले जाते. विशेष म्हणजे, काही काळापूर्वी शी जिनपिंग यांच्या मध्यस्थीने इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील संबंधांमध्ये सुधारणा झाल्याचे चित्र होते. मात्र या नव्या दाव्यांमुळे पश्चिम आशियातील राजकीय समीकरणे अधिक गुंतागुंतीची बनली आहेत.या सर्व आरोपांवर सौदी अरेबिया किंवा अमेरिकेकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप आलेली नसली, तरी या वृत्तामुळे इस्लामिक देशांमध्ये आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मोठी चर्चा सुरू झाली आहे.




