लिटल ब्लॉसम स्कूल परिसरातील घटना; पालकांचा संताप, व्यवस्थापनावर प्रकरण दडपण्याचा आरोप.
इगतपुरी येथील लिटल ब्लॉसम स्कूल मध्ये एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. शाळा सुटल्यानंतर मुलं घरी जात असताना पहिलीत शिकणारा सहा वर्षांचा विद्यार्थी आपल्या बुटाची लेस बांधण्यासाठी शाळेच्या आवारात खाली वाकला होता. त्याचवेळी शाळेतील शिक्षक यश कदम यांची कार त्या मार्गाने जात होती.
मुलगा खाली वाकलेला असल्याने चालकाच्या लक्षात न आल्यामुळे कारचे चाक थेट त्याच्या अंगावरून गेल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात विद्यार्थ्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला चार टाके घालावे लागले. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार सध्या त्याची प्रकृती स्थिर आहे.
घटनेनंतर शाळा प्रशासनाने योग्य ती पारदर्शकता न दाखवल्याचा आरोप पालकांकडून केला जात आहे. सुरुवातीला अपघाताबाबत चुकीची माहिती देण्यात आली, तसेच सीसीटीव्ही फुटेज देण्यास टाळाटाळ करण्यात आल्याचा दावा तक्रारदारांनी केला आहे. दरम्यान, या घटनेचे सीसीटीव्ही दृश्य समोर आले असून त्यावरून चालकाच्या निष्काळजीपणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत.




