यकृताच्या कर्करोगामुळे वडील व्हेंटिलेटरवर; झिम्बाब्वे विरुद्धच्या सामन्याआधी रिंकू तातडीने दिल्लीला रवाना.
भारतीय क्रिकेट संघाचा ‘मॅच फिनिशर’ म्हणून ओळखला जाणारा रिंकू सिंह सध्या एका अत्यंत कठीण प्रसंगातून जात आहे. एकीकडे टी-२० वर्ल्ड कप २०२६ चा थरार रंगात आलेला असताना, दुसरीकडे रिंकूच्या कुटुंबावर मात्र आरोग्याचे मोठे संकट ओढवले आहे. त्याचे वडील, खानचंद्र सिंह यांची प्रकृती अचानक खालावल्याने त्यांना ग्रेटर नोएडा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या ते व्हेंटिलेटरवर मृत्यूशी झुंज देत आहेत. सुरुवातीला त्यांच्या आजाराबाबत गुप्तता पाळण्यात आली होती, मात्र आता मिळालेल्या माहितीनुसार त्यांना यकृताचा (लिव्हर) कर्करोग झाला असून तो चौथ्या स्टेजवर (Stage 4) असल्याचे निष्पन्न झाले आहे.
वडिलांच्या प्रकृतीची ही विदारक बातमी समजताच, रिंकू सिंह २४ फेब्रुवारी रोजी चेन्नईतील सराव सत्र सोडून तातडीने दिल्लीला रवाना झाला. कुटुंबावरील या संकटामुळे त्याने सरावाकडे पाठ फिरवून आपल्या पित्याची भेट घेतली. एकीकडे मैदानावर प्रतिस्पर्धी गोलंदाजांची धुलाई करणारा हा योद्धा आज वैयक्तिक आयुष्यात हतबल झाला आहे. चालू स्पर्धेत रिंकूला फलंदाजीत अद्याप मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही, पाचही डावात त्याला १५ धावांचा टप्पा ओलांडता आला नाही, त्यातच आता या मानसिक धक्क्यामुळे त्याच्यापुढील अडचणी वाढल्या आहेत.
रिंकू सिंह झिम्बाब्वे विरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यात खेळणार का? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, तो वडिलांची भेट घेऊन पुन्हा संघात परतण्याची शक्यता असली, तरी सध्याच्या परिस्थितीमुळे तो प्लेइंग-११ मधून बाहेर राहू शकतो. भारतीय संघ सध्या सुपर-८ मध्ये नेट रन रेटच्या पेचात अडकलेला असताना रिंकूची अनुपस्थिती टीम इंडियासाठी मोठी चिंता ठरू शकते. मात्र, अशा कठीण काळात संपूर्ण क्रिकेट जगत आणि भारतीय चाहते रिंकूच्या वडिलांच्या प्रकृतीसाठी प्रार्थना करत आहेत.




