पश्चिम बंगालच्या राजकारणात मोठा बदल घडवत भारतीय जनता पक्षाने विधानसभेत प्रभावी कामगिरी करत स्पष्ट बहुमत मिळवले आहे. या विजयामुळे राज्याच्या सत्तेवर भाजपचा झेंडा फडकणार हे निश्चित झाले असले, तरी मुख्यमंत्रीपदासाठी अद्याप अधिकृत चेहरा जाहीर करण्यात आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक विजयाबद्दल पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांचे अभिनंदन करत त्यांच्या मेहनतीचे कौतुक केले आहे.
दरम्यान, नव्या सरकारच्या स्थापनेसाठी हालचाली वेगाने सुरू झाल्या आहेत. शपथविधी सोहळ्याची तारीखही जाहीर करण्यात आली असून, राज्यात लवकरच नवीन मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्रीपदासाठी एक नाव जवळपास निश्चित झाल्याची चर्चा सुरू आहे. या निवडणुकीत भाजपने तब्बल 206 जागांवर विजय मिळवला, तर ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेसला 80 जागांवर समाधान मानावे लागले. या निकालामुळे राज्यातील सत्तांतर निश्चित झाले आहे. मुख्यमंत्रीपदासाठी पक्षश्रेष्ठी कोणाला संधी देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राजकीय चर्चांमध्ये सुवेंदू अधिकारी यांचे नाव आघाडीवर असल्याचे बोलले जात आहे. त्यांनी निवडणुकीत ममता बॅनर्जी यांचा पराभव केल्यामुळे त्यांची दावेदारी अधिक मजबूत मानली जात आहे. त्यामुळे पक्ष नेतृत्व त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करू शकते, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, 9 मे रोजी कवी रवींद्रनाथ टागोर यांच्या जयंतीनिमित्त शपथविधी सोहळा आयोजित करण्याची तयारी सुरू असल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे त्या दिवशी बंगालला नवे नेतृत्व मिळण्याची शक्यता अधिक बळकट झाली आहे.




