Tukaram Mundhe Decision About Vada Pav : वडापाव-समोसा विक्रेत्यांना FDAचा इशारा; वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ विकल्यास होणार कारवाई

spot_img

अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर राज्यभरात भेसळखोर आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिकांविरोधात कठोर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. आता त्यांच्या नेतृत्वाखाली एफडीएने रस्त्यावरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांसाठी महत्त्वाचा निर्णय घेतला असून वडापाव, समोसा, भजीपाव, सॅण्डविच यांसारखे खाद्यपदार्थ वर्तमानपत्राच्या कागदात गुंडाळून विकण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशामुळे राज्यातील हजारो लहान-मोठ्या विक्रेत्यांना पॅकिंगसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागणार आहे.

एफडीएच्या तपास मोहिमांदरम्यान अनेक ठिकाणी खाद्यपदार्थ थेट वर्तमानपत्रात गुंडाळून ग्राहकांना दिले जात असल्याचे निदर्शनास आले. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, वर्तमानपत्र छापण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, झिंक, कॅडमियम यांसारखे धातू आणि रासायनिक घटक असतात. हे घटक अन्नपदार्थांच्या संपर्कात आल्यास मानवी आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा लक्षात घेऊन ही कारवाई करण्यात आली आहे.

खरे तर खाद्यपदार्थ वर्तमानपत्रात विकण्यास यापूर्वीही बंदी होती, मात्र अनेक विक्रेते या नियमाकडे दुर्लक्ष करत असल्याचे आढळून आले. त्यामुळे आता विभागाने पुन्हा एकदा स्पष्ट निर्देश देत सर्व विक्रेत्यांना नियमांचे पालन करण्याचा इशारा दिला आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाईसह कायदेशीर पावले उचलली जाऊ शकतात.

दरम्यान, अनेक विक्रेत्यांनी आधीच बटर पेपर, फूड-ग्रेड पेपर, सिल्व्हर फॉईल आणि इतर सुरक्षित पॅकिंग साहित्याचा वापर सुरू केला आहे. ग्राहकांच्या आरोग्याशी तडजोड होऊ नये यासाठी एफडीएकडून सातत्याने तपासणी मोहीम राबवली जाणार असल्याचे संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे येत्या काळात खाद्यपदार्थ विक्री व्यवसायात स्वच्छता आणि सुरक्षिततेच्या नियमांचे अधिक काटेकोर पालन करावे लागणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ