१२ वर्षांत पहिल्यांदाच विरोधकांकडून सरकारची कोंडी; रात्री ८:३० च्या भाषणाकडे संपूर्ण भारताचे लक्ष
भारतीय राजकारणात गेल्या दशकभरात कधीही न पाहिलेला थरार काल लोकसभेत अनुभवायला मिळाला. केंद्रातील मोदी सरकारने अत्यंत प्रतिष्ठेचे केलेले ‘नारी शक्ती वंदन विधेयक’ (१३१ वी घटनादुरुस्ती) पुरेशा बहुमताअभावी नामंजूर झाले. १२ वर्षांत पहिल्यांदाच विरोधकांनी अभूतपूर्व एकजूट दाखवत सरकारचे विधेयक पाडले असून, हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शासनकाळातील सर्वात मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. या पार्श्वभूमीवर, आज रात्री ८:३० वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला संबोधित करणार आहेत. यापूर्वी नोटबंदी आणि लॉकडाऊनसारख्या मोठ्या घोषणा त्यांनी रात्रीच केल्या होत्या, त्यामुळे आज मोदी महिला आरक्षणावरून विरोधकांना थेट भिडणार की एखादी मोठी ‘मास्टरस्ट्रोक’ घोषणा करणार, याकडे संपूर्ण देशाचे डोळे लागले आहेत.
या विधेयकावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आता आरपारची लढाई सुरू झाली आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी सरकारवर घणाघाती आरोप करत म्हटले की, “महिला आरक्षणाच्या आडून सरकारला मतदारसंघांची पुनर्रचना करून सत्तेचा अमरपट्टा हवा होता, जे षडयंत्र आम्ही उधळून लावले.” दुसरीकडे, केंद्रीय मंत्री किरेन रिजीजू यांनी याला विरोधकांची ‘महिलाविरोधी’ मानसिकता ठरवत, त्यांना आता देशातील महिलांच्या संतापाला सामोरे जावे लागेल, असा इशारा दिला आहे. लोकसभेत विधेयकाच्या बाजूने २९८ तर विरोधात २३० मते पडली, परंतु घटनादुरुस्तीसाठी आवश्यक असलेले दोन तृतीयांश बहुमत सरकारला जुळवता आले नाही. कालच्या पराभवानंतर मोदींनी विरोधकांना ‘फटका बसेल’ असा इशारा दिला होता, त्याचे प्रतिबिंब आजच्या रात्रीच्या भाषणात उमटण्याची दाट शक्यता आहे.




