“रोहितवर अन्याय झालाय”; सलग पराभवांच्या मालिकेनंतर हार्दिक पंड्या पुन्हा एकदा टीकेच्या रडारवर
आयपीएल २०२६ च्या हंगामात पाचवेळचा विजेता मुंबई इंडियन्स संघ विजयासाठी अक्षरशः चाचपडत असून, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील या संघाला आतापर्यंत पाचपैकी फक्त एकच सामना जिंकता आला आहे. गुरुवारी घरच्या मैदानावर पंजाब किंग्सकडून झालेला दारुण पराभव मुंबईच्या चाहत्यांच्या जिव्हारी लागला आहे. संघात सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि स्वतः हार्दिक पंड्यासारखे दिग्गज खेळाडू असूनही मैदानावर कामगिरी ‘क्लिक’ होत नसल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. गुणतालिकेत तळातून दुसऱ्या क्रमांकावर फेकल्या गेलेल्या मुंबई इंडियन्सच्या या दुरवस्थेला हार्दिकची ‘कमकुवत कॅप्टन्सी’ जबाबदार असल्याचा सूर आता उमटू लागला आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू मनोज तिवारी याने हार्दिकच्या नेतृत्वगुणांवर सडकून टीका करत त्याला थेट कर्णधारपद सोडण्याचा सल्ला दिला आहे. तिवारी म्हणाला की, “हार्दिकने ज्या पद्धतीने मुंबई इंडियन्सचा चार्ज घेतला, तेव्हापासून त्याच्या खेळात आणि नेतृत्वात घसरण झाली आहे.” त्याने रोहित शर्माचे उदाहरण देत आठवण करून दिली की, २०१३ ते २०२३ या काळात रोहितने संघाला पाच वेळा चॅम्पियन बनवले. रोहितला हटवून त्याच्यावर अन्याय करण्यात आला असून, संघाचे हित लक्षात घेता हार्दिकने पायउतार होऊन पुन्हा रोहितकडे धुरा सोपवावी, असेही तिवारीने स्पष्टपणे मांडले. आता सलग पराभवांच्या नामुष्कीनंतर मुंबईचे व्यवस्थापन मनोज तिवारी यांच्या या सल्ल्याचा विचार करणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.




