देशभरात गाजत असलेल्या नीट परीक्षेच्या वादात आता नवे वळण आले आहे. काँग्रेसचे प्रवक्ते आलोक शर्मा आणि प्रिया शर्मा यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करत नीट परीक्षा राष्ट्रीय परीक्षा एजन्सी (NTA) कडून न घेता स्वतंत्र आणि पारदर्शक यंत्रणेमार्फत आयोजित करण्याची मागणी केली आहे. परीक्षेदरम्यान झालेल्या कथित गैरव्यवहार, पेपरफुटीचे आरोप आणि परीक्षेच्या विश्वासार्हतेवर निर्माण झालेल्या प्रश्नांचा उल्लेख याचिकेत करण्यात आला आहे.
याचिकाकर्त्यांनी रद्द झालेल्या परीक्षांमुळे लाखो विद्यार्थ्यांना मानसिक ताणासोबत आर्थिक फटका बसल्याचा दावा केला असून, प्रभावित उमेदवारांना नुकसानभरपाई देण्याची मागणीही केली आहे. याशिवाय संपूर्ण प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाच्या देखरेखीखाली व्हावी, अशी मागणी करण्यात आली आहे. नीट परीक्षेभोवती सुरू असलेल्या वादामुळे विद्यार्थी आणि पालकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली असून, आता सुप्रीम कोर्टाच्या पुढील निर्णयाकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.




