दरवर्षी 27 फेब्रुवारीला ‘मराठी भाषा गौरव दिन’ साजरा केला जातो. हा दिवस ज्येष्ठ कवी वि.वा. शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांच्या जन्मदिनी असतो. पण अलीकडच्या काळात एक नवा वैचारिक प्रवाह समोर येतोय – तो म्हणजे, मराठी भाषा दिन हा 1 ऑगस्ट रोजी म्हणजेच साहित्यरत्न, लोकशाहीर, सत्यशोधक अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीदिनी का नसावा?आज आपण कोणत्याही वादात न पडता, या दोन्ही महान साहित्यिकांच्या साहित्याची, त्यांच्या जीवनप्रवासाची आणि मराठी भाषेला त्यांनी दिलेल्या जागतिक ओळखीची तुलना करणार आहोत. कोणाचे साहित्य मराठी माणसाच्या आणि जगाच्या काळजाला जास्त भिडले? कोणाच्या साहित्यातून समाजाचे वास्तववादी चित्रण झाले? आज याचीच चर्चा करुयात.
प्रथम आपण कुसुमाग्रजांबद्दल बोलूया. शिरवाडकर हे मराठी साहित्यातील एक मोठे नाव. ‘विशाखा’ सारख्या काव्यसंग्रहातून त्यांनी मराठी मनावर अधिराज्य गाजवलं. ‘नटसम्राट’ या त्यांच्या नाटकाने मराठी रंगभूमीला एक वेगळी उंची दिली. परंतु हे नाटक शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’ या नाटकाच्या मूळ संकल्पनेवर आणि ‘ओथेलो’च्या काही छटांवर आधारित आहे. त्यामुळे त्यांच्या साहित्यावर एक टीका नेहमी केली जाते, ती म्हणजे त्यांचे साहित्य हे ‘कल्पनाविलासा’त रमणारे आहे. त्यांनी शेक्सपिअरच्या ‘किंग लिअर’वरून ‘नटसम्राट’ लिहिले, तर इतर अनेक विदेशी साहित्याचा अनुवाद मराठीत केला. म्हणजेच, त्यांनी बाहेरील ज्ञान मराठीत आणले, जे नक्कीच स्तुत्य आहे. पण ते समाजाच्या शेवटच्या थरापर्यंत पोहोचले का? हा प्रश्न उरतोच. शिवाय त्यांनी नवीन मूळ मराठी साहित्य कमी निर्माण केलं, तर अनुवादच जास्त केलेत.
दुसऱ्या बाजूला आहेत साहित्यरत्न, लोकशाहिर, सत्यशोधक अण्णाभाऊंचं साहित्य. अण्णाभाऊंचे जीवन ही एक महागाथा आहे. केवळ दीड दिवस शाळेत गेलेले अण्णाभाऊ पुढे साहित्यरत्न म्हणून ओळखले जाऊ लागले. शाळेतल्या एका ब्राह्मण शिक्षकाने “मांगाचं पोर शाळेत कसं?” असा प्रश्न विचारून त्यांना शाळेबाहेर काढलं. पण त्याच अण्णाभाऊंनी मराठीला आपल्या लेखणीतून घराघरात पोहोचवलं. अण्णाभाऊंचे साहित्य हे केवळ कल्पनाविलास नाही, तर ते ‘वास्तववाद’ आहे. “जग बदल घालुनी घाव, सांगून गेले मला भीमराव” असं म्हणणाऱ्या अण्णाभाऊंनी साहित्यातून क्रांती पेरली. त्यांनी 35 कादंबऱ्या, अनेक लोकनाट्ये आणि कथा लिहिल्या. ‘फकिरा’ सारखी कादंबरी आजही जागतिक साहित्यात मानाचे स्थान राखून आहे.
अण्णाभाऊंच्या साहित्यातून लोकांच्या समस्या, समाजातील विदारक परिस्थिती व जीवनीचे चिंतन दिसतं. ‘कण्सं तोडून पोट भरायचं आसतं, कुणाचं डोस्कं फोडून न्हाय’ हा त्यांच्या फकिरामधील एक संवाद जीवन जगण्याचा मार्ग दाखवतो. या व अशा अनेक संवादांतून त्यांनी अगदी सहजरित्या जीवन दर्शन घडवून आणले. जेव्हा त्यांचा कोंबडीचोर पाटलाला म्हणतो, ‘पाटील, या फुटक्या बशीला स्वातंत्र्य मिळालंय की या कान तुटलेल्या कपाला स्वातंत्र्य मिळालंय?’ तेव्हा 1947 साली इंग्रजांकडून मिळालेलं स्वातंत्र त्या शेवटच्या माणसापर्यंत पोहचलं का? हा प्रश्न आपल्याला पडल्याशिवाय राहत नाही.
शिरवाडकरांनी निर्माण केलेलं साहित्य व अण्णाभाऊंनी निर्माण केलेलं साहित्य यात काही मौलिक फरक आहे. शिरवाडकरांनी विदेशी साहित्याचे मराठीत भाषांतर केले. याउलट, अण्णाभाऊंनी अस्सल मराठी, मातीतील साहित्य निर्माण केलं, त्याचे भाषांतर रशियन, चेक, पोलिश आणि इंग्रजी यांसारख्या जागतिक भाषांमध्ये झाले. म्हणजे अण्णाभाऊंनी मराठीची ओळख सातासमुद्रापार नेली, असेच म्हणावे लागेल. दुसरं असं की, शिरवाडकरांचे साहित्य अभिजात वर्गासाठीचे होते, तर अण्णाभाऊंचे साहित्य कष्टकरी, शेतकरी आणि बहुजनांच्या वेदना मांडणारे होते. “पृथ्वी ही शेषनागाच्या डोक्यावर नसून कामगारांच्या तळहातावर तरलेली आहे,” हे सांगण्यासाठी लागणारे धाडस केवळ अण्णाभाऊंकडेच होते.
असे असताना मराठी भाषा गौरव दिन हा 27 फेब्रुवारीलाच का? अण्णाभाऊंनी निर्माण केलेले साहित्य हे विस्ताराने आणि गुणवत्तेने शिरवाडकरांच्या तुलनेत खूप मोठे आणि वास्तववादी आहे. ज्या माणसाला शाळेतून हकलले गेले, त्या माणसाचे साहित्य आज विद्यापीठांमध्ये शिकवले जाते, हा मराठी भाषेचा सर्वात मोठा गौरव नाही का? ज्यांनी मराठी भाषेला जगभरात प्रतिष्ठा मिळवून दिली, ज्यांच्या साहित्याने समाजाच्या डोळ्यात अंजन घातले, त्या अण्णाभाऊंच्या जन्मदिनी मराठी भाषा दिन असणे हे जास्त न्यायसंगत वाटते. अण्णाभाऊंनी केवळ मनोरंजन केले नाही, तर समाजव्यवस्था बदलण्यासाठी साहित्याचा शस्त्र म्हणून वापर केला. त्यांचे साहित्य आजही तितकेच प्रासंगिक आहे.
शिरवाडकरांचे योगदान नाकारता येणार नाही, पण जेव्हा आपण ‘मराठी भाषेची अस्मिता’ आणि ‘जागतिक ओळख’ यांचा विचार करतो, तेव्हा अण्णाभाऊ साठे यांचे नाव अग्रक्रमाने येते. दीड दिवस शाळेत गेलेल्या माणसाने साहित्याचा डोंगर उभा केला, हे मराठी भाषेचे सर्वात मोठे यश आहे. मराठी भाषा दिन 27 फेब्रुवारीलाच असावा की तो 1 ऑगस्ट रोजी अण्णाभाऊंच्या जयंतीनिमित्त साजरा व्हायला हवा? यावर तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा.




