पुण्यातील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या नांदेड सिटी परिसरात सुनेची हत्या करून फरार झालेल्या सासऱ्याला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. भानुदास भास्कर चौधरी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, तो गेल्या आठ दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देत होता. जळगाव स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) गोपनीय माहितीच्या आधारे कारवाई करत त्याला ताब्यात घेतले.
ही धक्कादायक घटना 2 मे रोजी पुण्यात घडली होती. घरगुती कारणांवरून झालेल्या वादातून आरोपीने आपल्या सूनबाई Swati Tejas Chaudhari यांच्या डोक्यावर वार करत त्यांची हत्या केल्याचा आरोप आहे. घटना घडल्यानंतर आरोपीने घराला बाहेरून कुलूप लावले आणि तेथून पलायन केले. या प्रकरणी हवेली पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
दरम्यान, आरोपी जळगाव शहरातील मेहरूण गाव परिसरात लपून बसल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर एलसीबीच्या पथकाने परिसरात सापळा रचून महादेव मंदिराजवळ आरोपीला अटक केली. पोलिसांनी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने ही कारवाई पार पाडल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली.
अटक करण्यात आल्यानंतर आरोपीची प्राथमिक चौकशी करण्यात आली असून, पुढील तपासासाठी त्याला पुणे पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या घटनेमुळे पुण्यातील नांदेड सिटी परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. कौटुंबिक वाद इतका टोकाला जाऊन एका महिलेचा जीव गेला, यामुळे नागरिकांमध्येही चिंता व्यक्त केली जात आहे.
आता आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्याने या प्रकरणातील तपास अधिक वेगाने पुढे जाणार असून, घटनेमागील नेमके कारण काय होते याचा शोध पोलीस घेत आहेत.




