Entertainment : विक्रम गोखले यांच्या अखेरच्या चित्रपटाचा टीजर प्रदर्शित; ‘बेवारस’बाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता

spot_img

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांच्या चाहत्यांसाठी भावनिक क्षण ठरणारी एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. त्यांच्या अभिनयाने सजलेला अखेरचा चित्रपट ‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ याचा टीजर नुकताच प्रदर्शित करण्यात आला असून त्याला प्रेक्षकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. सामाजिक आशय, भावनिक संघर्ष आणि प्रभावी अभिनय यांचा संगम असलेल्या या चित्रपटाची चर्चा टीजर प्रदर्शित होताच रंगू लागली आहे. हा चित्रपट 25 जून रोजी जगभरातील प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

‘बेवारस – सत्य एका वळणावरचं’ हा चित्रपट एका अनाथ मुलाच्या आयुष्याभोवती फिरणारी संवेदनशील कथा मांडतो. शारीरिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या या मुलाचा न्यायासाठीचा संघर्ष आणि त्याच्या आयुष्यात येणाऱ्या विविध आव्हानांची मांडणी चित्रपटात करण्यात आली आहे. या कथेला सामाजिक वास्तवाची जोड देण्यात आली असून त्यामुळे चित्रपट अधिक प्रभावी ठरताना दिसत आहे.

चित्रपटात विक्रम गोखले यांनी अनाथालय चालवणाऱ्या तत्त्वनिष्ठ आबाजींची भूमिका साकारली आहे. त्यांच्या अभिनयातील भावनिक खोली आणि व्यक्तिरेखेतील प्रामाणिकपणा टीजरमधून प्रकर्षाने जाणवतो. त्यांच्या सोबत तेजस्विनी पंडित, रोहिणी हट्टंगडी, उषा नाईक, ऋतुजा बागवे, निहार गिते, उदय टिकेकर, श्रीजित मराठे आणि आदित्य देशमुख यांसारखे अनुभवी कलाकारही महत्त्वाच्या भूमिकांमध्ये दिसणार आहेत.

चित्रपटाची कथा आणि दिग्दर्शन विजय राणे यांनी केले असून निर्मिती सौ. रिया कुमार, नितीन विचारे आणि शिव आर्यन यांनी केली आहे. प्रभावी पटकथा, संवाद, संगीत आणि तांत्रिक बाजू यांमुळे चित्रपटाचा दर्जा उंचावल्याचे टीजरवरून दिसून येते. भावनिक आणि सामाजिक विषय हाताळणाऱ्या या चित्रपटातून प्रेक्षकांना एक वेगळा अनुभव मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विक्रम गोखले यांच्या अभिनयाचा अखेरचा ठसा उमटवणारा हा चित्रपट त्यांच्या चाहत्यांसाठी विशेष ठरणार आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ