Ahilyanagar-Kalyan Highway Accident : अहिल्यानगर-कल्याण महामार्गावर एसटी बस ओढ्यात उलटून भीषण अपघात; चालक आणि प्रवाशाचा मृत्यू, २६ जण गंभीर जखमी

spot_img

गुंजाळवाडी हद्दीत अज्ञात वाहनाला वाचवण्याच्या नादात चालकाचे नियंत्रण सुटले; स्थानिक ग्रामस्थांनी क्रेन मागवून केले मदतकार्य

ओतूर,प्रतिनिधी : रमेश तांबे

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील जुन्नर तालुक्यातील गुंजाळवाडी गावच्या हद्दीत रविवारी (१७ मे) सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास एक अत्यंत भीषण आणि काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडला आहे. भिवंडी आगाराची शेगाव-कल्याण एसटी बस (क्र. MH 14 BT 4023) प्रवाशांनी भरलेली असताना गुंजाळवाडी येथे रस्त्याच्या कडेला असलेल्या ओढ्यात दोन-तीन वेळा उलटली. समोरून येणाऱ्या एका भरधाव अज्ञात वाहनाला वाचवण्याच्या प्रयत्नात चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाला. या भीषण दुर्घटनेत एसटी चालक मोहम्मद सलीम आणि एका प्रवाशासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाला असून, २६ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.

या अपघातात मृत्यू झालेल्यांची नावे मोहम्मद सलीम (वय ४०, रा. अमरावती – बस चालक) आणि प्रशांत साईनाथ होनशेटे (वय २७, रा. नांदेड – प्रवासी) अशी आहे. ही बस अहिल्यानगरहून भिवंडीच्या दिशेने जात असताना गुंजाळवाडी येथील ओढ्यात कोसळली. अपघाताची तीव्रता एवढी मोठी होती की बस पूर्णपणे उलटी झाली आणि तिचे अतोनात नुकसान झाले. बसमध्ये अडकलेल्या प्रवाशांच्या किंकाळ्या ऐकून गुंजाळवाडी येथील स्थानिक नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि जीवाची पर्वा न करता मदतकार्य सुरू केले.

या अपघातात कोंडीभाऊ वाकचौरे (७०), कमल वाकचौरे (६७), शंकर शेजाळ (५०), वैशाली शेजाळ (२३), मगन पाटोळे (४८), शोभा पाटोळे (३०), शारदा मेंगळे (५९), अश्विनी बहिरट (४८), अलका गायकवाड (५८), अरुण गुंजाळ (५१), दीपाली डोंगरे (३३), उल्हास तांबे (७०), यमुना पावसे (६०), दिव्या पवार (२१), सिद्धेश काळे (१०), आशा काळे (३५) आणि नितीन काळे (३८) यांच्यासह एकूण २६ प्रवासी जखमी झाले आहेत. उलटलेली बस सरळ करण्यासाठी आणि जखमींना बाहेर काढण्यासाठी अखेर क्रेन पाचारण करावी लागली. ग्रामस्थांच्या मदतीने तातडीने सर्व जखमींना आळेफाटा येथील खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद झाली असून, आळेफाटा पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक चंद्रशेखर डुंबरे पुढील तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ