spot_img

Arijit Singh : अरिजीत सिंहच्या निवृत्तीच्या निर्णयाला ‘या’ गायकीचा पाठिंबा म्हणाली, ही निवृत्ती नाही तर…

spot_img

पार्श्वगायन सोडण्याच्या निर्णयानंतर सोनाने बॉलिवूडच्या संगीत व्यवस्थेवर साधला थेट निशाणा

प्रसिद्ध गायक अरिजीत सिंहने चित्रपटांमधील पार्श्वगायनातून माघार घेण्याचा निर्णय जाहीर केल्यानंतर संपूर्ण संगीतविश्वात चर्चा सुरू झाली आहे. मात्र, अरिजीतने संगीत क्षेत्रातून पूर्णपणे दूर जाण्याचा निर्णय घेतलेला नसून, केवळ चित्रपटांतील पार्श्वगायन न करण्याचं स्पष्ट केलं आहे. त्याच्या या निर्णयावर अनेकांनी आश्चर्य व्यक्त केलं असताना, काही कलाकारांनी त्याला उघड पाठिंबा दिला आहे.

प्रसिद्ध गायिका श्रेया घोषालने अरिजीतच्या निर्णयाचं स्वागत केल्यानंतर आता गायिका सोना मोहपात्रानेही त्याची जोरदार पाठराखण केली आहे. आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी ओळखल्या जाणाऱ्या सोनाने सोशल मीडियावर सविस्तर पोस्ट शेअर करत अरिजीतच्या निर्णयाला ‘धाडसी आणि परिवर्तनकारी’ असं म्हटलं आहे.

सोनाने तिच्या पोस्टमध्ये नमूद केलं की, पार्श्वगायन सोडणं म्हणजे इंडस्ट्रीतून बाहेर पडणं नव्हे, तर स्वातंत्र्य, सर्जनशीलता आणि स्वतःच्या अटींवर संगीत निर्माण करण्याकडे केलेलं पाऊल आहे. अरिजीतने हा निर्णय का घेतला याचा अंदाज बांधणं टाळत, ही कारणं वैयक्तिक आणि योग्य असतील, असं मत तिने व्यक्त केलं. तिच्या मते, या निर्णयामुळे नव्या गायकांसाठी संधी निर्माण होणार असून वेगळ्या आणि नव्या आवाजांना वाव मिळेल.

याचसोबत सोनाने बॉलिवूडमधील संगीत व्यवस्थेवरही परखड शब्दांत टीका केली. निर्माते ‘शून्य-जोखीम’ धोरणावर काम करत असून, ठराविकच आवाजांचा सतत वापर केला जातो, असा आरोप तिने केला. अनेकदा डेमो गायकांना मोबदला दिला जात नाही, संधीच्या नावाखाली कलाकारांचे शोषण केलं जातं आणि अखेरीस पुन्हा एकाच लोकप्रिय आवाजात गाणं रेकॉर्ड केलं जातं, असं सोनाने स्पष्ट केलं.

अरिजीतचा निर्णय हा केवळ वैयक्तिक नसून संपूर्ण संगीत क्षेत्रासाठी दिशादर्शक ठरू शकतो, असं सांगत सोनाने त्याचं मनापासून कौतुक केलं आहे. तसेच, या निर्णयानंतर शोकमय वातावरण निर्माण करणाऱ्या प्रतिक्रियांवरही तिने नाराजी व्यक्त केली. अरिजीत कुठेही गायब होत नसून तो संगीतनिर्मिती करतच आहे, मग अधिक आवाज आणि कल्पकतेची भीती का बाळगली जाते? असा सवाल तिने उपस्थित केला. एका कलाकाराने भीतीऐवजी स्वातंत्र्याची निवड करणं ही नव्या पर्वाची सुरुवात असल्याचं मत व्यक्त करत सोनाने तिची पोस्ट संपवली आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ