जम्मू-काश्मीरच्या डोडा जिल्ह्यात गुरुवारी झालेल्या भीषण अपघातात लष्कराचे एक वाहन रस्त्यावरून घसरून खोल दरीत कोसळले. या अपघातात 10 लष्करी जवानांचा मृत्यू झाला असून, इतर काही जवान गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिकांनी आणि बचाव पथकांनी एकत्रितपणे रेस्क्यू ऑपरेशन राबवून जखमी जवानांना बाहेर काढले. या अपघाताबाबत माहिती देताना लष्करी अधिकाऱ्यांनी सांगितले की, गुरुवारी एक लष्करी वाहन 17 जवानांना घेऊन उंच भागातील एका चौकीकडे जात होते. यावेळी डोडा जिल्ह्यातील भद्रवाह-चंबा आंतरराज्य महामार्गावरील खानी टॉप परिसरात लष्कराचे बुलेटप्रूफ वाहन रस्त्यावरून घसरले आणि सुमारे 200 फूट खोल दरीत कोसळले. या भीषण अपघातात 10 जवानांचा मृत्यू झाला असून उर्वरित जवान गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची माहिती मिळताच लष्कर आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने तातडीने बचाव मोहीम सुरू केली. स्थानिक नागरिकही पोलिस आणि रेस्क्यू टीमच्या मदतीसाठी घटनास्थळी दाखल झाले. बचाव मोहिमेदरम्यान 10 जवानांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. जखमी जवानांनाही दरीतून बाहेर काढण्यात आले असून, त्यापैकी अनेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी असलेल्या तिघा जवानांना हेलिकॉप्टरद्वारे उधमपूर येथील कमांड रुग्णालयात हलवण्यात आले असून, तेथे त्यांच्यावर विशेष उपचार सुरू आहेत.




