‘राजा शिवाजी’ हा वैयक्तिक नाही तर सामूहिक प्रयत्नांचा सिनेमा; रितेश देशमुख यांची भावनिक प्रतिक्रिया
दिग्दर्शक रवी जाधव आणि अभिनेता-दिग्दर्शक रितेश देशमुख (Ritesh Deshmukh) यांच्यात मतभेद असल्याच्या चर्चांवर अखेर रवी जाधव (Ravi Jadhav ) यांनी स्वतः खुलासा केला आहे. एका पॉडकास्टमध्ये बोलताना रवी जाधव म्हणाले की, “माझ्यात आणि रितेश देशमुख यांच्यात कधीही शब्दांचं भांडण झालेलं नाही.”
रवी जाधव यांनी ‘राजा शिवाजी’ चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सेटला भेट दिल्याचं सांगत रितेश देशमुख यांच्या कामाचं मनापासून कौतुक केलं. “ज्या पद्धतीने रितेशने या चित्रपटासाठी स्वतःला पूर्णपणे झोकून दिलं आहे, ती गोष्ट खरंच कौतुकास्पद आहे. त्यांना हॅट्स ऑफ,” असं ते म्हणाले.
ते पुढे म्हणाले की, 2014–15 साली या चित्रपटाचं एक लहानसं स्वप्न पाहिलं होतं. तेव्हा मर्यादित बजेटमध्ये हा सिनेमा कसा साकारता येईल याचा विचार होता. मात्र आज ज्या भव्य स्तरावर ‘राजा शिवाजी’ चित्रपट साकारतो आहे, ती कल्पनाही तेव्हा केली नव्हती.
“सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांवर सिनेमा बनतो आहे. तो भव्य, योग्य पाठिंब्याने आणि कोणत्याही अडथळ्याशिवाय पूर्ण व्हायला हवा. महाराष्ट्रातील कोट्यवधी लोकांचं आराध्य दैवत असलेल्या शिवाजी महाराजांना समर्पित असलेला हा चित्रपट साकारण्यासाठी आपण सगळे एकत्र असायला हवं,” असं स्पष्ट मत रवी जाधव यांनी मांडलं.
रवी जाधव यांच्या या पॉडकास्टमधील वक्तव्याचा व्हिडीओ आणि कॅप्शन रितेश देशमुख यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. त्यावर प्रतिक्रिया देताना रितेश म्हणाले, “जिथे मैत्री असते, तिथे समजूतदारपणा असतो. रवी जाधव हे एक उत्कृष्ट चित्रपट निर्माते असून माझ्या आवडत्या दिग्दर्शकांपैकी एक आहेत. देवाचे आभार. ‘राजा शिवाजी’ हा माझा नाही, तर आमचा चित्रपट आहे. हा आमचा राजा, आमचा नायक—छत्रपती शिवाजी महाराजांना दिलेली एक श्रद्धांजली आहे.”




