पहिल्यांदाच सारा तेंडुलकर मराठीत बोलताना व्हायरल; आजीसाठी खास भेट घेण्याची गोष्ट केली शेअर
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर यांची लेक सारा तेंडुलकर नेहमीच कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. कधी सोशल मीडियावरील पोस्ट्स, कधी वैयक्तिक आयुष्य, तर कधी डेटिंगच्या अफवांमुळे. मात्र यावेळी सारा चर्चेत आली आहे ती तिच्या मराठी भाषेतील संवादामुळे. पहिल्यांदाच सारा (Sara Tendulkar) अस्सल मराठीत बोलताना दिसली असून तिचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
“मला एकच गोष्ट मराठीत शेअर करायची आहे,” असं म्हणत साऱ्याने आपल्या आयुष्यातील एक खास क्षण सर्वांसमोर मांडला. क्वचितच मराठी बोलणारी सारा इतक्या सहज आणि भावनिक पद्धतीने मराठीत व्यक्त झाल्याने चाहत्यांची मनं जिंकली गेली आहेत.
या व्हिडीओमध्ये सारा सांगते की, लहानपणी तिची आजी तिला छोट्या छोट्या सोन्याच्या वस्तू – कानातले, चेन अशा भेटवस्तू द्यायची. “तेव्हाच माझ्या मनात एक स्वप्न निर्माण झालं होतं की मोठी झाल्यावर मी स्वतःच्या कमाईतून आजीसाठी काहीतरी खास घेईन. आणि आज माझं ते स्वप्न पूर्ण झालं आहे,” असं म्हणत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
एका ज्वेलरी शोरूमच्या उद्घाटनप्रसंगी सारा उपस्थित होती. याच कार्यक्रमात तिने मराठीत संवाद साधला. अनेक दिवसांनंतर सारा मराठी बोलताना दिसल्यामुळे चाहत्यांमध्ये विशेष आनंद आणि उत्सुकता पाहायला मिळाली.
दरम्यान, काही दिवसांपूर्वी गोव्याच्या ट्रिपदरम्यानचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर सारा चर्चेत आली होती. त्या व्हिडीओमध्ये तिच्या हातात बिअरची बाटली दिसल्याने काही नेटकऱ्यांनी टीका केली होती, तर अनेकांनी तिच्या खासगी आयुष्याचा सन्मान राखत समर्थनही केलं होतं. याआधी सारा आणि क्रिकेटपटू शुभमन गिल यांच्याबाबतही चर्चा रंगल्या होत्या, मात्र त्या चर्चांवर दोघांनीही कधीच प्रतिक्रिया दिली नाही.
दरम्यान, तेंडुलकर कुटुंबात सध्या आनंदाचं वातावरण आहे. सचिन तेंडुलकर यांचा मुलगा अर्जुन तेंडुलकर याच्या लग्नाची तारीख ठरल्याच्या चर्चा सुरू आहेत. काही दिवसांपूर्वीच अर्जुनने आपल्या बालपणीच्या मैत्रीण सानियासोबत साखरपुडा केल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे तेंडुलकरांच्या घरी सध्या लग्नीनघाई सुरू असल्याचं चित्र आहे. एकूणच, यावेळी सारा तेंडुलकर तिच्या साध्या, भावनिक आणि अस्सल मराठी शब्दांमुळे सर्वांच्या मनात खास जागा निर्माण करताना दिसतेय.




