थंडीत फाटलेले व कोरडे ओठ होतात त्रासदायक; घरगुती स्क्रब, लिप बाम व नाईट केअरमुळे ओठ राहतील मऊ आणि आकर्षक.
हिवाळा सुरू झाला की त्वचेसोबतच ओठांनाही कोरडेपणाचा मोठा त्रास सहन करावा लागतो. बाजारातील महागडी प्रोडक्ट्स वापरूनही अनेकदा हवा तसा परिणाम दिसत नाही. परंतु काही साधे घरगुती उपाय केल्यास तुम्ही सहजपणे ओठांचे मऊपण व नैसर्गिक चमक टिकवून ठेवू शकता.
आठवड्यातून दोनदा लिप स्क्रब करा
थंड हवेमुळे ओठांवर डेड स्किन जमा होते. ती काढण्यासाठी घरचं स्क्रब खूप परिणामकारक ठरतं. १ चमचा मध, १ चमचा साखर आणि काही थेंब खोबरेल तेल मिसळून तयार झालेला हा नैसर्गिक स्क्रब ओठांवर हलक्या हाताने एक मिनिट मसाज करा. नंतर पुसून टाकल्यावर ओठ लगेच मऊ व तजेलदार दिसू लागतात.
लिपस्टिक लावण्याआधी ओठांची तयारी
फाटलेल्या ओठांवर थेट लिपस्टिक लावल्यास ती नीट बसत नाही. म्हणून मेकअप करण्यापूर्वी १० मिनिटे आधी थोडं व्हॅसलीन किंवा लिप बाम लावा. मॅट लुक हवा असल्यास नंतर टिश्यूने थर हलकाच पुसून टाका. यामुळे लिपस्टिकचे फिनिश सुंदर दिसते आणि ती जास्त वेळ टिकते.
रात्रीची केअर – ओठांना आवश्यक पोषण
झोपण्यापूर्वीच्या थोड्या काळजीमुळे ओठांचे आरोग्य खूप सुधारते. ओठांवर थोडं मध किंवा तूप लावून झोपल्यास रात्रभर त्यांना खोलवर ओलावा मिळतो. यामुळे सकाळी ओठ मऊ, गुळगुळीत आणि नैसर्गिक गुलाबी दिसतात.
हिवाळ्यात ओठांची निगा राखणे कठीण नाही – फक्त नियमित घरगुती काळजीने तुम्ही ओठांचा कोरडेपणा आणि फाटण्याची समस्या सहज दूर करू शकता.




