लेयरिंगपासून योग्य फॅब्रिकपर्यंत, जॅकेट्स–बूट्सची स्मार्ट निवड तुमचा विंटर लूक बनवेल परफेक्ट
हिवाळा सुरू होताच आपला पोशाख बदलणं गरजेचं होतं. स्वेटर, हूडी, जॅकेट्स यांची खरेदी अनेकांनी सुरू केली असेल. पण या सगळ्यात थंडीपासून बचाव करताना स्टाइलिश दिसणं हे आव्हान असतं. आणि योग्य कपडे, योग्य कॉंबिनेशन या दोन्ही गोष्टी पाळल्यास हिवाळ्यातही तुमचा लूक सहज उठून दिसू शकतो.
विंटर फॅशनमध्ये लेयरिंग हा सर्वात महत्त्वाचा भाग आहे. शरीराला फिट बसणारा थर्मल किंवा इनर वेअर, त्यावर हलका स्वेटर आणि बाहेर कोट किंवा जॅकेट—ही लेयरिंगची सर्वात परफेक्ट पद्धत मानली जाते. मात्र प्रत्येक थराचा रंग आणि टेक्श्चर एकमेकांशी छान जुळणं आवश्यक आहे, नाहीतर लूक गोंधळलेला दिसू शकतो.
हिवाळ्यात कपड्यांचे फॅब्रिकही जाणीवपूर्वक निवडणं गरजेचं. उबदार आणि स्टायलिश अशा दोन्ही गुणांची सांगड घालणारं फॅब्रिक निवडा. लोकरीचे विविध प्रकार, फ्लॅनेल, पॉलिस्टर, ट्वीड, मखमल, तसेच लेदर आणि डेनिम हे हंगामासाठी उत्तम पर्याय ठरू शकतात. तुमच्या लेयरिंगनुसार हलकं किंवा जाड फॅब्रिक निवडण्याचा विचार करा.
जॅकेट्स आणि कोटशिवाय हिवाळ्याची फॅशन अपुरीच. ट्रेंच कोट, पफर जॅकेट्स, लेदर जॅकेट्स आणि ब्लेझर्समध्ये गुंतवणूक केल्यास अनेक प्रसंगांसाठी वेगवेगळे लूक तयार करता येतात. आपल्या जीन्स किंवा ट्राउझर्सच्या रंगाशी कॉन्ट्रास्ट होईल असे 4–5 चांगल्या गुणवत्तेचे जॅकेट्स संपूर्ण हंगामात उपयोगी पडतात.
स्टायलिश दिसण्यासाठी पादत्राणे देखील तेवढीच महत्त्वाची असतात. हिवाळ्यात घोट्यापर्यंतचे बूट, लांब बूट, लेदर शूज किंवा स्नीकर्स तुमच्या लूकमध्ये उठाव आणतात. अरुंद जीन्स किंवा बॉडीकॉन आऊटफिट्ससोबत लांब बूट्स विशेषतः ट्रेंडी दिसतात. चुकीचे फुटवेअर तुम्हाला थंडी जाणवू देऊ शकतात, त्यामुळे उबदार व आरामदायक पर्याय निवडा.
शरीराच्या प्रकारानुसार पोशाख निवडणंही महत्त्वाचं आहे. जाड स्वेटर किंवा पफर जॅकेट्स काही लोकांवर छान दिसतात, तर काहींवर ते जड वाटू शकतात. त्यामुळे स्वतःला शोभतील अशाच स्टाइल्सची निवड करा आणि पादत्राणेदेखील दीर्घकाळ आराम देणारी असावीत.




