थंडीपासून संरक्षण, हाडांची मजबुती आणि सर्दी-खोकल्यापासून बचावासाठी कोणते तेल सर्वोत्तम? जाणून घ्या आयुर्वेद तज्ज्ञांचे सल्ले
थंडीची चाहूल लागल्याने वातावरणात गारवा वाढू लागला आहे. अशा वेळी नवजात आणि लहान मुलांची काळजी घेणे विशेष महत्त्वाचे ठरते. कारण प्रौढांच्या तुलनेत मुलांची रोगप्रतिकारक शक्ती तुलनेने कमी असल्याने त्यांना सर्दी, ताप आणि खोकल्याचा त्रास अधिक लवकर होऊ शकतो. त्यामुळे हवामान बदलताच प्रत्येक आई आपल्या मुलांना उबदार कपडे घालण्याबरोबरच त्यांना थंडीपासून बचाव करण्यासाठी इतर उपायही करते.
हिवाळ्यात योग्य तेलाने केलेली मालिशही शरीराला उष्णता देण्यासाठी आणि इन्फेक्शनपासून बचाव करण्यासाठी अत्यंत उपयुक्त मानली जाते. आयुर्वेद तज्ज्ञांच्या मते खालील तेलं मुलांसाठी विशेष लाभदायक आहेत:
तिळाचे तेल – नैसर्गिक उबदारपणा देणारे
तिळाचे तेल ‘गरम प्रकृती’चे असल्याने हिवाळ्यात मुलांसाठी सर्वोत्तम मानले जाते. यात व्हिटॅमिन ई, कॅल्शियम, मॅग्नेशियमसह शक्तिशाली अँटीऑक्सिडंट्स असतात. हे रक्तप्रवाह सुधारते आणि स्नायूंना बळकटी देते. मुलांच्या तळहात, तळवे आणि छातीवर कोमट तिळाचे तेल लावल्यास शरीराला उबदारपणा मिळतो आणि सर्दीचा त्रास कमी होतो.
मोहरीचे तेल – जंतुनाशक आणि उष्णतेचा उत्तम स्रोत
हिवाळ्यात बेबी ऑइलपेक्षा मोहरीचे तेल अधिक फायदेशीर मानले जाते. त्याच्या नैसर्गिक उष्णतेमुळे सर्दीची शक्यता कमी होते. तसेच त्यातील अँटीबॅक्टेरियल व अँटीफंगल गुणधर्म संसर्गापासून संरक्षण करतात. सकाळी मोहरीचे तेल लावून थोडावेळ बाळाला उन्हात ठेवल्यास आणखी चांगले परिणाम दिसतात.
नारळाचे तेल – त्वचेचे संरक्षण आणि उबदारपणा
हिवाळ्यात नारळाचे तेलही मुलांसाठी सुरक्षित पर्याय आहे. थोडेसे गरम करून मालिश केल्यास त्वचा मऊ राहते आणि त्यातील अँटीव्हायरल गुणधर्म इन्फेक्शनपासून बचाव करतात.
ऑलिव्ह ऑइल – सौम्य आणि त्वचेसाठी उपयुक्त
ऑलिव्ह ऑइल हलके, ॲलर्जीरहित आणि त्वचेला उत्तम मॉइश्चर देते. हे तेल गरम करण्याची गरज नसते. याच्या मालिशेमुळे थंडीत त्वचा कोरडी पडत नाही आणि शरीराला सौम्य उब मिळते.
हिवाळ्यात वेगवेगळ्या तेलांनी केलेली नियमित मालिश मुलांची शरीररचना मजबूत ठेवण्यास मदत करते आणि थंडीमधील आजारांपासून त्यांचे संरक्षणही करते.




