३० दिवसांत पायलट प्रोजेक्टची होणार सुरुवात; ओएनडीसी किंवा स्वतंत्र ॲपद्वारे ग्राहकांच्या भेटीला येणार कंपनी
देशातील आघाडीची ई-कॉमर्स कंपनी ‘फ्लिपकार्ट’ आता केवळ मोबाईल, कपडे आणि किराणा सामानापुरती मर्यादित न राहता थेट ऑनलाइन फूड डिलिव्हरी क्षेत्रात पाऊल ठेवण्याच्या तयारीत आहे. या नव्या निर्णयामुळे आधीपासूनच मार्केटमध्ये दबदबा असलेल्या ‘झोमॅटो’ आणि ‘स्विगी’ या दिग्गज कंपन्यांसमोर तगडे आव्हान उभे राहणार आहे. फ्लिपकार्ट समूहाचे मुख्य कार्यकारी अधिकारी कल्याण कृष्णमूर्ती यांनी दिलेल्या माहितीनुसार, कंपनी येत्या ३० दिवसांत फूड डिलिव्हरी सेवेचा पायलट प्रोजेक्ट सुरू करणार आहे. सुरुवातीला मोजक्याच भागांत याची चाचणी घेतली जाईल आणि ग्राहकांच्या प्रतिसादानुसार देशभरात तिचा विस्तार केला जाईल.
याआधीच क्विक कॉमर्स क्षेत्रात वेगाने विस्तार करत असलेल्या फ्लिपकार्टकडे देशभरात शेकडो डार्क स्टोअर्सचे मोठे नेटवर्क उपलब्ध आहे, ज्याचा फायदा फूड डिलिव्हरीसाठी होऊ शकतो. कंपनी ही नवीन सेवा स्वतःच्या ॲपद्वारे आणणार की सरकारच्या ‘ओपन नेटवर्क फॉर डिजिटल कॉमर्स’ (ONDC) च्या माध्यमातून सुरू करणार, याबाबत लवकरच चित्र स्पष्ट होईल. भारतात इंटरनेटचा वाढता वापर, वेगवान डिलिव्हरी आणि बदलत्या जीवनशैलीमुळे घरपोच जेवण मागवणाऱ्या ग्राहकांची संख्या झपाट्याने वाढली आहे. याच संधीचा फायदा घेण्यासाठी फ्लिपकार्ट आता सज्ज झाली असून, यामुळे आगामी काळात फूड डिलिव्हरी मार्केटमधील स्पर्धा अधिकच अटीतटीची होणार असल्याचे बाजार तज्ज्ञांचे मत आहे.




