टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा जप आणि वारकऱ्यांची सेवा करण्याची मिळाली संधी; सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
गेल्या काही वर्षांत मराठी कलाविश्वातील कलाकारांमध्ये ‘वारी’बद्दलचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले असून, अनेक अभिनेते आणि अभिनेत्री या पवित्र सोहळ्यात सहभागी होताना दिसत आहेत. यातच लोकप्रिय अभिनेत्री अक्षया नाईक हिने देखील यंदा आपल्या आयुष्यातील पहिली वहिली वारी अनुभवत विठुरायाच्या चरणी लीन होत नतमस्तक झाली आहे. वारी पूर्ण झाल्यानंतर अक्षयाने आपला हा प्रवास आणि आलेले अनुभव चाहत्यांसोबत सोशल मीडियावर शेअर केले असून, हा अनुभव तिच्यासाठी आयुष्यभर लक्षात राहणारा आणि मनाला समृद्ध करणारा असल्याचे तिने म्हटले आहे.
वारीबद्दल आपल्या भावना व्यक्त करताना अक्षयाने सांगितले की, आपल्या मनात नेहमीच वारीविषयी एक मोठी उत्सुकता होती की, आपण कधीतरी इतर वारकऱ्यांसोबत अशा प्रकारे वारीचा अनुभव घेऊ शकू का? मात्र, यंदा अचानक आलेल्या पांडुरंगाच्या बोलण्यामुळे तिची ही इच्छा पूर्ण झाली. वारीत अविरत चालणाऱ्या वारकऱ्यांच्या अंगात एवढी ऊर्जा येते कुठनं, याचा प्रत्यय तिथे प्रत्यक्ष गेल्यानंतर आला. टाळ-मृदुंगाचा गजर, हरिनामाचा अखंड जप आणि त्या वाटेवरील अफाट उत्साह शब्दांत मांडता येणार नाही, कारण वारी ही फक्त ऐकण्याची नव्हे तर प्रत्यक्ष अनुभवण्याची गोष्ट आहे, असे ती म्हणाली.
या वारीच्या प्रवासात तिला केवळ विठ्ठल-रखुमाईचे दर्शनच नाही तर वारकऱ्यांची सेवा करण्याची सुवर्णसंधी देखील लाभली, ज्यामुळे तिची वारी खऱ्या अर्थाने सुफळ संपूर्ण झाल्याची भावना तिने व्यक्त केली. आज अनेक कलाकार मंडळी वारीत सहभागी होत असून प्रत्येकाचा हा प्रवास भलेही वेगळा असेल, पण तो प्रत्येक कलाकाराच्या आयुष्यात एक वेगळा आणि अद्भुत अनुभव देऊन जाणारा ठरतो, याची अनुभूती अक्षयाला आली आहे.




