Bhagyashree Nhalve On Periods And Women Health : मासिक पाळीत आजही बाजूला बसते अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे; आजीच्या शिकवणीबद्दल आणि वैयक्तिक आयुष्यातील कठीण प्रसंगावर केली खुलकर भाष्य

spot_img

आईच्या निधनानंतरच्या दुःखातून सावरत अभिनेत्रीचा नवा दृष्टिकोन; म्हणालात तर हा शाप नाही, तर महिलांसाठीचा हक्काचा ‘रेस्ट टाईम’

‘कुंकू, टिकली आणि टॅटू’, ‘रमा राघव’, ‘पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर’ आणि ‘माटी से बंधी डोर’ यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री भाग्यश्री न्हाळवे हिने नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चढ-उतारांवर आणि मासिक पाळीबद्दलच्या (Menstruation) सामाजिक समजुतींवर मोठे भाष्य केले आहे. लग्नानंतर अवघ्या काही दिवसांतच आईच्या निधनामुळे तिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला होता; मात्र या मोठ्या आघातून ती मोठ्या धीराने सावरली आहे. दरम्यान, मुलाखतीत तिने मासिक पाळीच्या काळात स्वतःला दिल्या जाणाऱ्या विश्रांतीबद्दल एक अत्यंत सकारात्मक आणि हटके विचार मांडला आहे.

मासिक पाळी हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक नैसर्गिक भाग असला, तरी आजही समाजात याविषयी अनेक समज-गैरसमज आणि विटाळाच्या गोष्टी पाहायला मिळतात. यावर बोलताना भाग्यश्रीने सांगितले की, ती आजही मासिक पाळीच्या दिवसांत घरात बाजूला बसते आणि लग्नानंतर सासरीही ती या नियमाचे पालन करते. मात्र, त्यामागचा दृष्टिकोन विटाळाचा नसून तो पूर्णपणे विश्रांतीचा असल्याचे तिने स्पष्ट केले. लहानपणी आजीने दिलेली शिकवण सांगताना ती म्हणाली की, “आजीचं म्हणणं असायचं की बाजूला बसणं हा स्त्रियांना शाप नसून तो दिलेला आराम आहे. आपण प्रत्येक गोष्टीकडे कोणत्या दृष्टीने बघतो ते महत्त्वाचे असते. मला याची अजिबात लाज वाटत नाही.”

आजकालच्या धावपळीच्या युगात मुलींमध्ये पीसीओडी (PCOD) आणि पीसीओएस (PCOS) यांसारख्या फर्टिलिटीच्या समस्या झपाट्याने वाढत आहेत, ज्याचे मुख्य कारण म्हणजे विश्रांतीचा अभाव असल्याचे तिने नमूद केले. “मुली प्रत्येक गोष्टीत बरोबरी करायला जातात, पण ते गरजेचे नाही. मासिक पाळीच्या त्या चार दिवसांत ब्रेक घ्या, ताणतणाव बाजूला ठेवा, हवं तर पुस्तक वाचा, पेंटिंग करा, नामस्मरण करा किंवा मस्त झोपून आराम करा,” असा मोलाचा सल्ला तिने दिला आहे. स्वतःच्या शरीराला वेळ देऊन विश्रांती घेतल्यामुळे महिला अधिक निरोगी राहू शकतात, असा विश्वास व्यक्त करत भाग्यश्रीने या नैसर्गिक काळाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलण्याची गरज असल्याचे अधोरेखित केले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ