राज्यभरातील ५६ लाख पात्र शेतकऱ्यांना होणार फायदा; आधार प्रमाणीकरणानंतर थेट डीबीटीद्वारे खात्यात जमा होणार रक्कम
राज्य शासनाच्या अतिशय महत्त्वाकांक्षी अशा ‘पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना–२०२६’ अंतर्गत पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पात्र लाभार्थ्यांची यादी आज (२४ जुलै) अधिकृतपणे प्रसिद्ध करण्यात आली आहे. सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या ऐतिहासिक योजनेमुळे पुणे जिल्ह्यातील तब्बल ६१ हजार ९०० शेतकऱ्यांना ५२३ कोटी रुपयांचा मोठा आर्थिक लाभ मिळणार आहे. पुण्यात आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात काही पात्र शेतकऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या हस्ते कर्जमुक्तीच्या लाभाची पत्रे देखील सुपूर्द करण्यात आली आहेत.
केवळ पुणेच नव्हे, तर राज्यातील उर्वरित जिल्ह्यांतील पात्र शेतकऱ्यांच्या याद्याही आज जाहीर करण्यात येत असून, शासनाच्या या निर्णयामुळे राज्यातील एकूण सुमारे ५६ लाख शेतकऱ्यांना या कर्जमुक्तीचा थेट फायदा होणार आहे. पुणे जिल्हा बँकेची ही यादी महाआयटीच्या पोर्टलवर अपलोड करून संपूर्ण पडताळणी पूर्ण करण्यात आली आहे. पात्र ठरलेल्या शेतकऱ्यांना त्यांच्या नोंदणीकृत मोबाईलवर एसएमएसद्वारे आधार प्रमाणीकरणासाठी सूचना पाठवल्या जात आहेत. याद्या ग्रामपंचायत कार्यालये, सेवा सहकारी संस्था आणि बँक शाखांमध्येही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.
या योजनेचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना एक विशिष्ट क्रमांक देण्यात आला असून, आधार क्रमांक किंवा या विशिष्ट क्रमांकाच्या साहाय्याने ‘आपले सरकार सेवा केंद्रां’मार्फत आधार प्रमाणीकरण करणे बंधनकारक असणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी अद्याप ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी केली नाही, त्यांनी लवकरात लवकर नोंदणी करण्याचे आवाहन सहकार मंत्र्यांनी केले आहे. प्रमाणीकरण प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर डीबीटी (DBT) प्रणालीद्वारे कर्जमाफीची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार असून, ही योजना शेतकऱ्यांना नव्या उमेदीने उभे राहण्यासाठी मोठी मदत ठरेल, असा विश्वास सहकार विभातर्फे व्यक्त करण्यात आला आहे.




