Sachin Tendulkar : विद्यार्थी आंदोलनावर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची भावनिक पोस्ट; म्हणाला, ‘कष्टाला महत्त्व द्या, शॉर्टकट्स टाळा!’

spot_img

वडिलांच्या शिकवणीचा हवाला देत क्रिकेटपटूची विद्यार्थ्यांना आणि समाजाला साद; गुणवत्तेचा विजय होणारी संस्कृती घडवण्याचे आवाहन

देशभर सुरू असलेल्या विद्यार्थी आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर आता क्रिकेटविश्वाचे दैवत आणि भारतरत्न सचिन तेंडुलकर यांनीही आपले मौन सोडत अत्यंत महत्त्वाची भूमिका मांडली आहे. सोशल मीडियावर एक भावूक पोस्ट शेअर करत सचिन यांनी विद्यार्थ्यांच्या व्यथा समजून घेत त्यांना धीर दिला आहे. तसेच, कष्टाचे चीज होणारी आणि प्रामाणिकपणाला प्रोत्साहन देणारी संस्कृती निर्माण करण्याचे आवाहन त्यांनी संपूर्ण समाजाला केले आहे.

आपल्या वडिलांची आठवण काढत सचिन यांनी पोस्टमध्ये लिहिले की, माझे वडील प्राध्यापक होते आणि ते विद्यार्थ्यांचे प्रेरणास्थान होते. त्यांनी मला लहानपणीच एक मोलाची शिकवण दिली होती की, अपयश आले तरी चालेल पण कधीही गैरमार्ग किंवा शॉर्टकट स्वीकारू नका. आज जेव्हा विद्यार्थ्यांना त्यांच्या कष्टाचे योग्य फळ मिळत नाही आणि त्यांच्या पदरी निराशा येते, तेव्हा ती वेदना मी समजू शकतो. तरुणांची स्वप्ने आणि त्यांची ऊर्जा हेच आपल्या देशाचे खरे बळ आहे, त्यामुळे त्यांना पुन्हा अशी निराशा सहन करावी लागू नये, यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

पालक, शिक्षक, मित्र, शाळा आणि प्रशासक या सर्व घटकांनी आपली जबाबदारी योग्य प्रकारे पार पाडून तरुणांना प्रोत्साहित केले पाहिजे, असा सल्लाही सचिन यांनी दिला आहे. जो समाज कष्टापेक्षा केवळ निकालांना महत्त्व देतो, तिथे शॉर्टकट्सला प्राधान्य दिले जाते, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. अखेरीस, मुलांचे भविष्य बळकट करण्यासाठी आणि त्यांच्या आकांक्षांचे जतन करण्यासाठी आपण सर्वजण मिळून नक्कीच योग्य उपाय शोधू काढू, असा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त करत आपल्या पोस्टचा शेवट ‘जय हिंद’ ने केला आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ