महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासन विभागाची कारवाई अधिक तीव्र झाली असून, गेल्या काही काळात भेसळयुक्त पदार्थ, अवैध गुटखा आणि खाद्य व्यवसायांवर धडक कारवाई केली जात आहे. सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर FDAच्या कारवाईला वेग आल्याचे चित्र आहे. याच मोहिमेअंतर्गत छत्रपती संभाजीनगरातील प्रसिद्ध ‘मे. उत्तम उपहार गृह’वर कारवाई करण्यात आली.
शहरातील इमरती आणि इतर मिठाईसाठी प्रसिद्ध असलेल्या या आस्थापनाच्या तपासणीत अनेक गंभीर त्रुटी आढळल्याचे FDAने सांगितले. समोसे आणि भजी तळण्यासाठी वारंवार वापरलेले तेल तसेच इमरती-जलेबीसाठी पुन्हा वापरले जाणारे वनस्पती तूप तपासणीत आढळले. तेलाचे TPC/BR रीडिंग सुरक्षित मर्यादेपेक्षा जास्त असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
अन्न तयार करण्याच्या ठिकाणी झुरळांचा वावर, अस्वच्छ भिंती, काळपट तेलाचे थर आणि ड्रेनेजजवळ उघड्यावर ठेवलेले इडलीचे पीठ आढळल्याची माहिती आहे. मिठाईमध्ये वापरल्या जाणाऱ्या कृत्रिम रंगाच्या योग्य वापराबाबत कामगारांना पुरेशी माहिती नसल्याचेही तपासणीत समोर आले.
याशिवाय २५ ते ३० कामगारांकडे मेडिकल फिटनेस प्रमाणपत्रे नव्हती. तंबाखूची पाकिटे, भिंतींवरील थुंकीच्या खुणा, उघडी कचरापेटी आणि खिडक्यांना जाळ्या नसल्याचेही आढळले.
हॉटेलकडे रेस्टॉरंटचा परवाना असताना प्रत्यक्षात मिठाई उत्पादन केले जात असल्याने परवान्याबाबतही गंभीर त्रुटी आढळली. या सर्व कारणांमुळे FDAने परवाना तात्काळ निलंबित करून आस्थापना बंद केली आहे. वापरलेले तेल आणि वनस्पती तुपाचे नमुने प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.




