Omi Vaidya on Sonum Wangchuk : “रिअल लाईफ ‘फुन्सुक वांगडू’ला मरू देऊ नका!” सोनम वांगचुक यांच्या उपोषणाला ‘३ इडियट्स’ फेम ‘चतुर’चा भावनिक पाठिंबा

spot_img

दिल्लीत नीट (NEET) घोटाळ्याविरोधातील उपोषणाचा १६ वा दिवस | ओमी वैद्यचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल; आमीर खानच्या शांततेवरही प्रश्नचिन्ह

दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या नीट (NEET-UG) परीक्षा घोटाळ्याविरोधातील आंदोलनाने आता गंभीर वळण घेतले आहे. शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या आमरण उपोषणाला १६ दिवस पूर्ण झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक बनली आहे. अशा अत्यंत नाजूक परिस्थितीत, ‘३ इडियट्स’ चित्रपटात ‘चतुर रामलिंगम’ (सायलेन्सर) ही अजरामर भूमिका साकारणारा लोकप्रिय अभिनेता ओमी वैद्य हा सोनम वांगचुक यांच्या समर्थनात पुढे आला आहे. ओमीने सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर करत वांगचुक यांना जाहीर पाठिंबा दिला आहे.

“मी खऱ्या आयुष्यातील फुन्सुक वांगडूला मरताना पाहू शकत नाही,” अशा शब्दांत त्याने देशवासीयांना या आंदोलनाकडे लक्ष देण्याचे आवाहन केले आहे. ‘३ इडियट्स’ चित्रपटातील आमीर खानने साकारलेले ‘फुन्सुक वांगडू’ हे मुख्य पात्र सोनम वांगचुक यांच्याच खऱ्या आयुष्यापासून आणि संशोधनापासून प्रेरित होते.

ओमी वैद्यने आपल्या व्हिडिओ संदेशात अत्यंत संवेदनशीलतेने आपली भूमिका मांडली. तो म्हणाला “मी फुन्सुक वांगडूला मरताना पाहू इच्छित नाही. मी ‘३ इडियट्स’मधला तोच चतुर आहे आणि आज मला एक महत्त्वाचा संदेश द्यायचा आहे. ज्यांच्यापासून प्रेरित होऊन फुन्सुक वांगडूचे पात्र पडद्यावर साकारले गेले, ते सोनम वांगचुक आज जंतर-मंतरवर जीवन-मरणाची लढाई लढत आहेत. माझी त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटही झाली आहे. ते आपल्या शिक्षण व्यवस्थेतील उत्तरदायित्वासाठी आणि लडाखच्या हक्कांसाठी लढत आहेत. आपल्या सर्वांची मते भिन्न असू शकतात, पण समाजासाठी आपले आयुष्य वेचणाऱ्या अशा थोर व्यक्तीला या अवस्थेत पाहणे अत्यंत वेदनादायी आहे.”

ओमीने पुढे आवाहन केले की, ज्यांना कोणाला वांगचुक यांच्या मागण्या न्याय्य वाटतात, त्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपला आवाज बुलंद करावा आणि लोकप्रतिनिधींपर्यंत हा मुद्दा पोहोचवावा.

‘कॉकरोच जनता पार्टी’च्या (CJP) नेतृत्वाखाली जंतर-मंतरवर गेल्या २४ दिवसांपासून नीट परीक्षेतील गैरव्यवहाराच्या चौकशीसाठी आणि केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी आंदोलन सुरू आहे. सोनम वांगचुक २८ जूनपासून या आंदोलनात सहभागी होऊन बेमुदत उपोषणावर बसले आहेत.

आंदोलनकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या १६ दिवसांत केवळ पाणी, मीठ आणि मिनरल्सवर राहिल्यामुळे वांगचुक यांचे वजन तब्बल ८.२ किलोने घटले आहे. त्यांच्या रक्तातील साखरेची पातळी (Blood Sugar) धोकादायकरीत्या ७० mg/dL च्या खाली गेली असून, त्यांना सतत चक्कर येणे आणि प्रचंड अशक्तपणा जाणवत आहे. तरीही सरकारकडून अद्याप कोणतीही अधिकृत दखल न घेतली गेल्यामुळे आंदोलनकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.

ओमी वैद्यच्या या व्हिडिओची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू असतानाच, दुसरीकडे ज्येष्ठ वकील आणि सामाजिक कार्यकर्ते प्रशांत भूषण यांनी यावरून मुख्य अभिनेता आमीर खानला टोला लगावला आहे. प्रशांत भूषण यांनी ओमीचा व्हिडिओ रिपोस्ट करत लिहिले, “३ इडियट्समधील किमान एका पात्राने तरी जंतरमंतरवर उपोषणाला बसलेल्या खऱ्या आयुष्यातील फुन्सुक वांगडूला उघड पाठिंबा देण्याचे धाडस दाखवले.” यामुळे आता या संवेदनशील मुद्द्यावर बॉलीवूडमधील बड्या कलाकारांच्या मौनावरही बोट ठेवले जात आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ