Israel Mossad : मोसादचा सर्वात मोठा आणि गुप्त प्लॅन फ्लॉप! इराणचा नकाशा पुसण्याची भाषा करणारा माजी राष्ट्राध्यक्षच निघाला इस्रायलचा ‘मोहरा’

spot_img

द न्यू यॉर्क टाइम्स’चा खळबळजनक खुलासा: महमूद अहमदीनेजाद यांच्या मदतीने इराणमध्ये तख्तापलटाचा होता कट; बुडापेस्टमध्ये गुप्त बैठका अन् कोट्यवधींचा फंड; सध्या देशद्रोहाच्या आरोपाखाली नजरकैदेत

जगाच्या पाठीवर आपल्या शत्रूला कुठेही शोधून त्याचा गेम वाजवणारी इस्रायलची गुप्तचर संस्था ‘मोसाद’ सध्या एका अत्यंत थरारक आणि तितक्याच चक्रावून टाकणाऱ्या ऑपरेशनमुळे जगभरात चर्चेत आली आहे. इस्रायलने आपला सर्वात कट्टर शत्रू आणि इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांनाच आपल्या जाळ्यात ओढून, त्यांच्या माध्यमातून इराणमध्ये सत्तापालट (तख्तापलट) घडवून आणण्याची एक महागुप्त योजना आखली होती. अमेरिकेचे नामांकित वृत्तपत्र ‘द न्यू यॉर्क टाइम्स’ने आपल्या शोध पत्रकारितेच्या (Investigative Journalism) अहवालातून हा खळबळजनक पर्दाफाश केला आहे. मात्र, अत्यंत टोकापर्यंत पोहोचलेले हे मिशन अखेरच्या टप्प्यात पूर्णपणे अपयशी ठरले आहे.

या महाकटू रचनेची सुरुवात २०२४ च्या सुरुवातीला झाली. हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथील ‘लुडोविका युनिव्हर्सिटी ऑफ पब्लिक सर्व्हिस’च्या रेक्टरना (प्रोफेसर गेरगेली डेली) तिथल्या सरकारकडून एक अजब आदेश आला. युनिव्हर्सिटीमध्ये ‘हवामान बदल’ (Climate Change) या विषयावर एक जागतिक परिषद आयोजित करण्यास सांगण्यात आले आणि त्याचे मुख्य पाहुणे म्हणून इराणचे माजी राष्ट्राध्यक्ष महमूद अहमदीनेजाद यांना निमंत्रित करण्यात आले.

वास्तविक, ही परिषद केवळ एक मुखवटा होती. अहमदीनेजाद यांना सुरक्षितपणे इराणबाहेर आणून इस्रायली एजंट्सच्या समोरासमोर बसवणे हाच यामागचा खरा अजेंडा होता. खुद्द मोसादचे तत्कालीन प्रमुख डेव्हिड बार्निया हे स्वतः अहमदीनेजाद यांना भेटण्यासाठी बुडापेस्टला पोहोचले होते.

अहमदीनेजाद यांच्या परदेश दौऱ्यांचा आणि राहण्याचा सर्व खर्च मोसादकडून गुप्तपणे केला जात होता, ज्याची माहिती अमेरिकेच्या ‘सीआयए’लाही (CIA) देण्यात आली होती. जून २०२५ मध्ये अहमदीनेजाद पुन्हा बुडापेस्टला आले. तिथे त्यांच्यासोबत असलेल्या इराणच्या ‘इस्लामिक रिव्होल्युशनरी गार्ड कॉर्प्स’ (IRGC) च्या अधिकृत सुरक्षा रक्षकांना (बॉडीगार्ड्स) चकवा देऊन ते दोन वेळा गायब झाले आणि त्यांनी इस्रायली अधिकाऱ्यांसोबत दीर्घ चर्चा केली.

महमूद अहमदीनेजाद हे २००५ ते २०१३ दरम्यान इराणचे राष्ट्राध्यक्ष होते. “इस्रायलला जगाच्या नकाशावरून मिटवून टाकू” अशी आक्रमक भाषा करणारे आणि होलोकॉस्ट नाकारणारे नेते म्हणून त्यांची ख्याती होती. मात्र, राष्ट्राध्यक्षपदावरून पायउतार झाल्यानंतर त्यांचा नूर बदलला. त्यांनी खाकी जॅकेट सोडून महागडे सूट परिधान करणे सुरू केले, इंग्रजी शिकले आणि स्वतःला उदारमतवादी दाखवण्याचा प्रयत्न केला. इराणच्या सध्याच्या व्यवस्थेत आपण पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही, हे समजल्यावर त्यांनी थेट शत्रू देश इस्रायल आणि अमेरिकेचा हात धरून इराणचे ‘बॉस’ बनण्याचे स्वप्न पाहिले. “मी सत्तेत आलो तर इस्रायलला मान्यता देऊन संबंध सामान्य करेन,” असे आश्वासनही त्यांनी मोसादला दिले होते.

हा गुप्त प्लॅन फेब्रुवारी २०२६ पर्यंत अतिशय सुनियोजितपणे सुरू होता. परंतु, अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात प्रत्यक्ष युद्ध पेटले. २८ फेब्रुवारी रोजी इस्रायलने इराणमधील अहमदीनेजाद यांच्या ठिकाणावर एक मोठा हवाई हल्ला केला. या हल्ल्याचा खरा उद्देश तिथल्या सुरक्षारक्षकांना गुंतवून ठेवून अहमदीनेजाद यांना तिथून पळवून सुरक्षित स्थळी नेण्याचा होता.

त्याच दिवशी इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाला. अलीकडेच झालेल्या त्यांच्या अंत्ययात्रेत अहमदीनेजाद कित्येक महिन्यांनी पहिल्यांदा जाहीरपणे दिसले. कडक उकाडा असूनही अंगावर जड जॅकेट आणि चेहऱ्यावर मास्क लावून ते कडेकोट सुरक्षा वेढ्यात गुपचूप उभे होते. या अचानक झालेल्या घडामोडींमुळे इराणच्या गुप्तचर यंत्रणेने सर्व धागेदोरे जोडले आणि अहमदीनेजाद यांच्या इस्रायलसोबतच्या देशद्रोही कराराचा भांडाफोड झाला. सध्या ते IRGC च्या गोपनीय विभागाच्या ताब्यात असून, देशद्रोहाच्या आरोपाखाली त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे.

हे सुद्धा वाचा
- जाहिरात -spot_img

महाराष्ट्र बातम्या

व्हॉट्सअप चॅनल जॉईन करा
टेलिग्राम जॉईन करा

व्हिडीओ